डोपिंगमुळे हिंदुस्थानला दुहेरी धक्का, स्पर्धेपूर्वी दिलबाग सिंग, अरुण कुमार संघातून बाहेर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेला सुरुवात होण्यापूर्वीच हिंदुस्थानी पथकाला मोठा धक्का बसला आहे. डोपिंगविरोधी नियमांच्या उल्लंघनामुळे हिंदुस्थानचा वेटलिफ्टिंगमधील कोटा 12 वरून 11 वर आला असून, त्यामुळे वेटलिफ्टर दिलबाग सिंगला संघाबाहेर जावे लागले आहे. दुसरीकडे, हिंदुस्थानी ज्यूदोपटू अरुण कुमार डोप चाचणीत अपयशी ठरल्याने त्यालाही स्पर्धेतून बाहेर करण्यात आले आहे.

दिलबागला बाहेर करण्याचा निर्णय

कोटा कमी झाल्यानंतर संघात बदल करत दिलबाग सिंग याला वगळण्यात आले. सूत्रांच्या माहितीनुसार, तो आधीपासूनच पाठीच्या दुखापतीने त्रस्त होता. बार्ंमगहॅम येथे झालेल्या सराव शिबिरातही त्याला नियमित सराव करता आला नव्हता. त्यामुळे त्याला संघाबाहेर करण्याचा निर्णय घेण्यात आला.

डोपिंगचा हिंदुस्थानला फटका

पात्रता कालावधीत हिंदुस्थानी वेटलिफ्टिंगमधील अनेक खेळाडू डोपिंग प्रकरणात अडकले. पुरुष गटात एन. अजित (71 किलो), साईराज परदेशी (88 किलो) आणि हरचरण सिंग (110 किलो) यांच्यावर डोपिंगमुळे बंदी घालण्यात आली. तसेच महिला गटातील वंशिता वर्मा (86 किलो) हिच्याविरुद्धही डोपिंगविरोधी नियमांच्या उल्लंघनाची नोंद झाली. या सलग घटनांचा फटका हिंदुस्थानच्या वेटलिफ्टिंग कोटय़ाला बसला.

ज्यूदोपटू अरुण कुमारही स्पर्धेबाहेर

हिंदुस्थानी ज्यूदे संघालाही मोठा धक्का बसला आहे. स्टार ज्यूदोपटू अरुण कुमार स्पर्धेबाहेर झाला आहे. स्पर्धेबाहेरील डोप चाचणीत त्याच्या नमुन्यात ऍनाबॉलिक स्टेरॉइड आढळून आल्याने त्याला राष्ट्रकुल स्पर्धेतून वगळण्यात आले. 31 जुलैपासून सुरू होणाऱया ज्यूदो स्पर्धेत अरुण हा हिंदुस्थानच्या पदकाचा प्रमुख दावेदार मानला जात होता.

पदकाच्या आशांना मोठा धक्का

राष्ट्रकुल स्पर्धेत वेटलिफ्टिंग हा हिंदुस्थानचा सर्वाधिक यशस्वी खेळ राहिला आहे. अशा परिस्थितीत वेटलिफ्टिंगचा कोटा कमी होणे आणि ज्यूदोतील प्रमुख खेळाडू डोपिंगमुळे बाहेर पडणे, यामुळे हिंदुस्थानच्या पदकाच्या आशांना मोठा धक्का बसला आहे. तरीही मीराबाई चानू, बिंदियाराणी देवी आणि इतर अनुभवी खेळाडूंवर हिंदुस्थानच्या पदकाच्या अपेक्षा कायम आहेत.