
>> साधना गोरे [email protected]
विठ्ठल हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे. ‘विठ्ठल हा गोपजनांचा देव आहे’, असं मत विठ्ठलाच्या अभ्यास क्षेत्रात प्रथम दुर्गा भागवत यांनी मांडलं, नंतर डॉ. जी.ए. दलरी आणि ग्यंथर सोनथायमर यांनी त्या दिशेने काम केलं. डॉ. रा.चिं. ढेरे यांनी याच दिशेने विपुल आणि सखोल संशोधन करून ‘श्रीविठ्ठल ः एक महासमन्वय’ हा ग्रंथ लिहिला. ढेरे यांच्या मते, ‘विठोबा हा मूळ एक लोकदेव असला, तरी अन्य अनेक लोकदैवतांप्रमाणे त्याची कीर्ती मर्यादित न राहता ती सतत वाढत गेली. इतकी की समाजातल्या शास्त्राr-पंडितांना त्याला शास्त्रप्रतिष्ठा देणं भाग पडलं आणि त्या दृष्टीने विठ्ठलाचे वैदिकीकरण आणि वैष्णवीकरण घडवून आणण्यात आले. ही प्रक्रिया संतांच्या उदयापूर्वी सुरू झाली आणि आजही ती चालू आहे.
‘विठ्ठल’ नावाच्या व्युत्पत्तीविषयी अभ्यासक, संत आणि विचारवंत यांच्यात विविध मतप्रवाह आहेत. काही विद्वानांच्या मते, ‘विष्णू’ या संस्पृत शब्दाचं रूप बदलत बदलत प्रापृत रूप ‘विठ्ठल’ झालं. विष्णू – विटणु – विठ्ठु – विठ्ठल असा बदल झाल्याचे विद्वानांचे मत आहे. कन्नड साहित्यात आणि शिलालेखांत विष्णूसाठी ‘विट्टू’ किंवा ‘विट्ठल’ असा शब्द आढळतो. त्यावरून हे नाव दक्षिण भारतातून आलं असावं असाही एक कयास आहे. वारकरी परंपरेनुसार आणि लोकसाहित्यात भक्त पुंडलिकासाठी विटेवर उभा राहिलेला तो ‘विठ्ठल’. ‘विट’ (वीट) + ‘थल’ (स्थान, ठिकाण किंवा प्रदेश). याचा अर्थ ‘विटेवर उभा असलेला देव’ असा होतो. संत साहित्यातही या अर्थाला विशेष प्राधान्य मिळाले आहे.
महाराष्ट्रातील पंढरपूर आणि विठ्ठल उपासनेचा संबंध कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातील शिलालेखांशी जोडला जातो. कानडी भाषेत विष्णूचा अवतार मानल्या गेलेल्या नावाचे रूप ‘विट्टू’ असे आहे. त्यामध्ये ‘ल’ हा प्रत्यय लागून ‘विठ्ठल’ हे नाव रूढ झाले असावे, असे इतिहासकार मानतात. तर विश्वनाथ खैरे यांनी तमिळमधील ‘इटु’ या शब्दाशी संबंध जोडण्याचा प्रयत्न केला आहे.
इतिहासाचार्य वि.का. राजवाडे यांच्या मते ‘विष्ठल’ म्हणजे दूर, रानावनातील जागा. त्यावरून ‘विठ्ठल’ हा शब्द तयार झाला असावा. यानुसार विठ्ठल हा मूळचा ग्रामदेवता किंवा वनप्रदेशाशी संबंधित देव असावा, असे त्यांनी सुचविले आहे. त्यांनी असेही म्हटले आहे की, सीयडोणी (जि. ललितपूर, उत्तर प्रदेश) शिलालेखाच्या चौथ्या व सत्ताविसाव्या ओळीत वीठू हा शब्द आलेला आहे. म्हणजे हा शब्द शक 876मध्ये प्रचलित होता. विष्णूची म्हणजे विठूची देवळेही होती!
व्युत्पत्तिकोशकार पृ.पां. पुलकर्णी यांचे म्हणणे काहीसे वेगळे आहे – ‘प्रिझुलस्की याच्या मते, ही देवता मूळ द्राविडी असून ‘विठु’ हे नाव आस्ट्रोएशियाटिक आहे. ‘विष्णू’ या शब्दाचा आस्ट्रोएशियाटिक अपभ्रंश ‘विठु’ असा झाला व पुढे ‘ल’ हा आदरार्थे प्रत्यय लागला. राजवाडे याची व्युत्पत्ती ‘विष्ठल’पासून देतात, ती मान्य होण्यासारखी नाही. या शब्दाच्या संभाव्य व्युत्पत्तींपैकी कोणतीही समाधानकारक वाटत नाही! ‘विष्णु’ आणि ‘विठु’ हे दोन मूळ भिन्न, परंतु पुढे परस्परसंबद्ध किंवा एकापासून दुसरा निघाला असे समजू लागले. ‘विष्णु’पासून ‘विटु’ निघणे स्वरप्रक्रियेच्या दृष्टीने अशक्य वाटते. परंतु हे दाखले व्युत्पत्तीबाबत निर्णायक नाहीत. उलट संस्कृतीकरण दर्शवतात. आस्ट्रोएशियाटिक म्हणावा तर विष्णु देवतेशी त्याचे ऐक्य कसे झाले? शिवाय हा कर्नाटक-महाराष्ट्रात रूढ असलेल्या भक्तिसंप्रदायात कसा निविष्ट झाला? कानडावो विठ्ठल या प्रयोगाचा व्युत्पत्तीस काही काही उपयोग होईल का?’ असे प्रश्न पुलकर्णींनी उपस्थित केले आहेत.
ज्ञानदेवांनी विठ्ठलाला ‘कानडा’ आणि ‘कर्नाटपु’ अशी दोन्ही विशेषणे लावलेली आहेत. एकनाथांनी ‘तीर्थ कानडे देव कानडे। क्षेत्र कानडे पंढरीये।’असे म्हटले आहे, तर नामदेवांनी ‘कानडा विठ्ठल तो उभा भीवरेतीरी’ असा निर्देश केला आहे. नामदेव तर विठ्ठलाचा भाषिक निर्देशही करतात, ‘विठ्ठल कानडे बोलू जाणे। त्याची भाषा पुंडलीक नेणे।।’ ‘कानडा म्हणजे अगम्य’ अशा अर्थानेही संतांनी श्रीविठ्ठलाचे उल्लेख केलेले आहेत. मात्र ‘कर्नाटपु’ या शब्दाचा कर्नाटक प्रदेशाशी संबंध नसून ‘कर्नाटपु’ म्हणजे ‘करनाटपु’ वा ‘लीलालाधव दाखविणारा’, असेही मत काही अभ्यासकांनी व्यक्त केलेले आहे.
विठ्ठल नामाविषयी अशी विविध मतमतांतरे असली तरी गुजराती भक्त-कवी, संत मीराबाई यांनी त्यांच्या लेखनात विठ्ठलाचा उल्लेख केला आहे. तसेच गुरुग्रंथ साहिब या शिखांच्या ग्रंथात संत नामदेवांनी भजने लिहिताना विठ्ठलाचे स्मरण केले आहे.






























































