
>> प्रांजल वाघ
[email protected]
कर्नाटक राज्यातील बेळगाव जिह्यातील सौंदत्ती तालुक्यात मलाप्रभा नदीच्या संथ वाहणाऱया प्रवाहाकाठी वसलेला मुनवळ्ळी किल्ला हा दक्षिण भारतातील मराठा साम्राज्य विस्तार आणि लष्करी नियोजनाचा एक उत्कृष्ट नमुना आहे. आज हा किल्ला काहीसा विस्मरणात गेला असला तरी त्याचा इतिहास अत्यंत देदीप्यमान आणि संघर्षमय आहे.
इ. स. 1674 च्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराजांनी जेव्हा आपली ऐतिहासिक दक्षिण दिग्विजय मोहीम फत्ते केली, तेव्हा हा संपूर्ण प्रदेश स्वराज्यात समाविष्ट करण्यात आला. या भागाचा कारभार आणि संरक्षणाची जबाबदारी शिवरायांनी आपले विश्वासू सरदार जिवाजी शिंदे यांच्याकडे सोपवली. पुयाच जिवाजी शिंदे यांनी तोरगळ- मुनवळ्ळी हे संस्थान स्थापन केलं.
सुरुवातीला या भागाचे लष्करी केंद्र जवळच असलेल्या तोरगळ किल्ल्यावर होते, परंतु तोरगळ येथील हवामान आणि सैन्याच्या घोडय़ांसाठी लागणाऱया चाऱयाची टंचाई यामुळे जिवाजी शिंदे यांनी नदीकाठच्या सुपीक जमिनीचा शोध सुरू केला. त्यांनी नवलगुंडच्या देसायांकडून मध्यस्थी करून मलप्रभा नदीकाठची मुनवळ्ळी ही जागा ताब्यात घेतली आणि तिथे लष्करी छावणी उभारून या मजबूत भुईकोट किल्ल्याची स्थापना केली.
मुनवळ्ळी किल्ला हा प्रामुख्याने लष्करी हालचाली आणि घोडदळाच्या संरक्षणासाठी बांधलेला एक भुईकोट किल्ला आहे. अंदाजे आठ एकर परिसरात पसरलेल्या या किल्ल्याची तटबंदी अत्यंत मजबूत आहे. किल्ल्याच्या सुरक्षेसाठी सहा मुख्य बाहेरील बुरूज बांधण्यात आले होते, ज्यांवरून शत्रूच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवले जाई. शत्रूला सहज आत प्रवेश करता येऊ नये म्हणून किल्ल्याभोवती खोल खंदक खोदण्यात आला होता – जो आज कोरडा पडला आहे. किल्ल्याच्या मध्यभागी अंदाजे अर्धा एकर क्षेत्रावर सुरक्षित बालेकिल्ला बांधण्यात आला आहे. या बालेकिल्ल्याला अंतर्गत पाच लहान बुरूज, धान्याची कोठारे आणि सुंदर नक्षीकाम केलेले सज्जे आहेत.
किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ उडचादेवी मंदिर असून येथे कन्नड भाषेतील ऐतिहासिक शिलालेख आणि नागदेवतेची सुंदर शिल्पे आतसेच मारुतीचे काळ्या पाषाणाचे अत्यंत सुबक मंदिर किल्ल्याच्या आत आहे.
पुकाळात हा किल्ला मुघल, पेशवे, म्हैसूरचे राजे (हैदर अली व टिपू सुलतान) आणि अखेर ब्रिटिशांच्या ताब्यात गेला. अनेक युद्धे आणि सत्तांतरे अनुभवलेला हा किल्ला आजही जुन्या तटबंदीसह दिमाखात उभा आहे. जरी आज किल्ल्याचा अंतर्गत भाग खासगी शेतीसाठी वापरला जात असला तरी या किल्ल्याच्या प्रत्येक दगडात मराठय़ांच्या पराक्रमाचा इतिहास जिवंत आहे!
































































