
<<स्वप्नील साळसकर>>
पंढरपूरच्या आषाढी वारीच्या निमित्ताने कलाकार अल्पेश घारे यांनी केलेली चित्रे अमेरिकेची वारी करीत आहेत. त्यानिमित्त…
सिंधुदुर्गातील युवा डिजिटल कलाकार अल्पेश घारे यांनी आपली कल्पकता, कलात्मक कौशल्याच्या जोरावर आंतरराष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राचा गौरव वाढवला आहे. पंढरपूर वारी सोहळ्याच्या निमित्ताने त्यांनी साकारलेल्या भव्य डिजिटल कॅनव्हास पेंटिंगना अमेरिकेतील रसिकांकडून दाद मिळाली आहे. ही चित्रे आता अमेरिकेला रवाना होणार आहेत. अल्पेश यांच्या चित्रकारीतून साकारलेल्या या चित्रांपैकी सिंहासनाधिष्ठित छत्रपती शिवाजी महाराज, वारीतील भावपूर्ण दृश्य, श्री योगेश्वरी देवी अंबाजोगाई ही चित्रे लक्षवेधी ठरली आहेत.
अल्पेश घारे मूळचे सिंधुदुर्ग जिह्याच्या कुडाळ तालुक्यातील पाट गावातील रहिवासी. घारे यांचे संपूर्ण कुटुंब शेतीवर अवलंबून आहे. लहानपणापासूनच अल्पेश यांना चित्रकलेची प्रचंड आवड होती. शालेय जीवनात चित्रकला हा छंद नसून त्यांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनली.
पाट विद्यालयात शिक्षणादरम्यान त्यांनी एलिमेंट्री आणि इंटरमिजिएट ग्रेड ड्रॉइंग या परीक्षा उत्तीर्ण केल्या. या दोन्ही परीक्षांमध्ये ‘ए’ ग्रेड मिळवली. शाळेत असताना जिल्हास्तरीय, तालुकास्तरीय व राज्यस्तरीय अशा अनेक चित्रकला स्पर्धांमध्ये घारे यांनी सातत्याने सहभाग घेतला. बहुतेक स्पर्धांमध्ये प्रथम, द्वितीय किंवा तृतीय क्रमांक पटकवला. वन विभागाच्या राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धेत संपूर्ण महाराष्ट्रात त्यांनी प्रथम क्रमांक मिळवला. घारे यांच्या आयुष्यातील हा अत्यंत महत्त्वाचा टप्पा ठरला.
बारावी पूर्ण झाल्यानंतर चित्रकलेत उच्च शिक्षण घेण्याच्या उद्देशाने घारे यांनी दादर येथील मॉडेल आर्ट इन्स्टिटय़ूटमध्ये एक वर्षाचा फाऊंडेशन कोर्स पूर्ण करत वर्षभर मेहनत घेऊन सर जे. जे. स्कूल ऑफ आर्टच्या सीईटी प्रवेश परीक्षेची तयारी केली. त्यात चांगले यश मिळविले. जे. जे. इन्स्टिटय़ूट ऑफ अप्लाईड आर्ट येथे पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला. दरम्यान महाविद्यालयात शिक्षण घेत असतानाच व्यावसायिक पेंटिंगची कामे, कॅनव्हास पेंटिंग आणि इतर कलाविषयक प्रकल्प असे काम ते करीत. प्रथम श्रेणीत पदवी प्राप्त करून पुढे अल्पेश यांनी अॅनिमेशन क्षेत्रातही बॅकग्राऊंड आर्टिस्ट आणि कन्सेप्ट आर्टिस्ट म्हणून काम केले. सध्या अल्पेश व्हीएफएक्स उद्योगात मॅट पेंटिंग आर्टिस्ट म्हणून कार्यरत आहेत. आपल्या प्रत्येक यशामागे आई-वडिलांचे कष्ट, कुटुंबाचा भक्कम पाठिंबा, गुरुवर्यांचे मार्गदर्शन असल्याचे घारे सांगतात.
नोकरीसोबतच आजही कमर्शियल आर्टवर्क, डिजिटल कॅनव्हास पैंटिंग, वॉल पेंटिंग, कन्सेप्ट आर्ट आणि मोठय़ा आकाराच्या कलाकृती घारे तयार करतात. त्यांच्या या कामाची गुणवत्ता आणि सातत्य पाहूनच अमेरिकेतील मराठी कुटुंबाकडून त्यांना पंढरपूरच्या वारीनिमित्त मोठय़ा आकाराच्या डिजिटल कॅनव्हास पेंटिंगची मागणी केली गेली. अत्यंत बारकाईने केलेले हे काम आहे. यानिमित्त हिंदुस्थानी कला आणि संस्कृती जगभर पोहोचविण्याचे स्वप्न साकार होत असल्याचे अल्पेश घारे यांनी सांगितले.
समुद्रकिनाऱ्यावर चित्रनिर्मिती
कोरोना लॉकडाऊनच्या काळात सर्व कामे बंद असताना घारे यांनी निराश न होता समुद्र किनाऱ्यावर वाळूत आणि रंगोळीच्या माध्यमातून भव्य चित्रनिर्मिती करण्यास सुरुवात केली. बोटांचा वापर करून रांगोळी आणि कलर स्प्रेच्या सहाय्याने त्यांनी अनेक विशाल आकाराची व्यक्तिचित्रे, कलाकृती साकारल्या. समुद्र किनाऱयावर तयार झालेली ही अनोखी चित्रे सोशल मीडियावर मोठय़ा प्रमाणात व्हायरल झाली आहेत. त्यातूनच घारे यांची एक वेगळी ओळख निर्माण झाली.





























































