इराणवर अमेरिकेचे सलग सातवेळा हल्ले; कोणत्याही सीमा सुरक्षित राहणार नाहीत, इराणचा इशारा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आखातातील संघर्ष अधिक तीव्र होत चालला आहे. अमेरिकेच्या सैन्याने शुक्रवारी इराणवर सलग सातव्यांदा मोठे हल्ले केले असून अमेरिकेच्या सेंट्रल कमांडने हल्ल्याला दुजोरा दिला आहे. अमेरिकेच्या या हल्ल्यानंतर इराणही आक्रमक झाला असून त्यांनी आता कोणत्याही सीमा सुरक्षित राहणार नसल्याचा इशारा दिला आहे.

अमेरिकेच्या सेंट्रल कमांडने दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकेच्या लष्कराने शुक्रवारी रात्री इराणवर सलग सातव्यांदा मोठे हल्ले केले आहेत. शांतता चर्चा फिसकटल्यानंतर तेहरानने कतार, कुवेत आणि जॉर्डनसह अमेरिकेच्या मित्र राष्ट्रांना लक्ष्य करत आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला चढवला होता. याला प्रत्युत्तर म्हणून अमेरिकेकडून ही लष्करी कारवाई करण्यात आली आहे. अमेरिकेच्या बॉम्बहल्ल्यात दक्षिण इराणमधील अनेक पुलांचे मोठे नुकसान झाले असून यामध्ये होर्मुझच्या सामुद्रधुनीवर वसलेल्या बंदर अब्बास या किनारपट्टीच्या शहराला जोडणाऱ्या प्रमुख मार्गांवरील पुलांचा समावेश आहे. अमेरिकेच्या या आक्रमक पवित्र्यानंतर दोन्ही देशांमधील तणाव कमालीचा वाढला आहे. इराणने अमेरिका आणि त्यांच्या मित्र राष्ट्रांना गंभीर इशारा दिला आहे.

इराणच्या सर्वोच्च नेत्याच्या एका वरिष्ठ लष्करी सल्लागाराने स्पष्ट केले आहे की, जर अमेरिकेने आठवड्याच्या अखेरीस किंवा पुढील दोन-तीन दिवस हा गोळीबार आणि हल्ले सुरूच ठेवले तर, येत्या काही दिवसांत इराण मोठ्या प्रमाणावर युद्ध किंवा आक्रमण पुन्हा सुरू करण्यास पूर्णपणे तयार आहे. अहवालानुसार, होर्मुझच्या सामुद्रधुनीजवळच्या निगराणी मनोरा नष्ट केला, त्याचे प्रत्युत्तर म्हणून तेहरानने आता पर्शियन आखातातील प्रमुख बंदरांना लक्ष्य करण्याची थेट धमकी दिली आहे. इराणी वृत्तसंस्था आयआरआयबीच्या वृत्तानुसार, इराण आता केवळ प्रत्युत्तरात्मक कारवाईपुरता मर्यादित राहणार नाही तर, यापुढे कोणतीही राजकीय सीमा सुरक्षित राहणार नसल्याचा इशारा मेजर जनरल मोहसेन रझाई यांनी दिला आहे.