केदारनाथ धामचे गर्भगृह बंद; सहा महिन्यांनी उघडणार दरवाजे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उत्तराखंडमधील प्रसिद्ध केदारनाथ धामचे दरवाजे बुधवार भाऊबीजेच्या पवित्र पर्वावर हिवाळय़ासाठी बंद करण्यात आले. वैदिक मंत्रोच्चार आणि धार्मिक विधींच्या वातावरणात सकाळी 8.30 वाजता मंदिराचे मुख्य दरवाजे पुढील सहा महिन्यांसाठी बंद करण्यात आले. या सोहळय़ाचे साक्षीदार होण्यासाठी देश-विदेशातून लाखो भाविक केदारनाथ येथे दाखल झाले होते.

धार्मिक मान्यतेनुसार, हिवाळय़ात केदारनाथ परिसरात मोठय़ा प्रमाणात बर्फवृष्टी आणि कडाक्याची थंडी पडत असल्याने मंदिराचे दरवाजे बंद केले जातात. त्यानंतर बाबा केदारांची विग्रह उत्सव डोली त्यांच्या हिवाळी निवासस्थानी म्हणजेच उत्तराखंडमधील रुद्रप्रयाग जिह्यातील उखीमठ येथे नेण्यात येणार आहे. उखीमठ येथील मंदिरात पुढील सहा महिने बाबा केदारांची पूजाअर्चा आणि धार्मिक विधी पार पडतील. भाविकांनी तिथे दर्शनही घेता येईल. सोमेश्वर देवतेच्या नेतृत्वाखाली माता यमुनेची उत्सव पालखी खरसाली येथील खुशीमठात पोहोचेल. पुढील सहा महिने भाविकांना याच हिवाळी गादीस्थळांवर दर्शन घेता येईल.

n या वर्षी दोन्ही धाममध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत अधिक भाविक पोहोचले. मंगळवारी संध्याकाळपर्यंत केदारनाथमध्ये 19 लाख 13 हजार आणि यमुनोत्रीमध्ये 8 लाख 84 हजार भाविकांनी दर्शन घेतले आहे. दोन्ही धाममध्ये एकूण 27 लाख 98 हजार भाविक पोहोचले. गेल्या वर्षीच्या तुलनेत केदारनाथमध्ये 1.45 लाख आणि यमुनोत्रीमध्ये 2.40 लाख अधिक भाविकांनी दर्शन घेतले.