इंदापूरच्या लाल मातीत धावले मानाचे अश्व..! संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यात हरिनामाचा जयघोष

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> नीलकंठ मोहिते

इंदापूरच्या पवित्र भूमीवर शनिवारी संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील दुसरे मानाचे गोल रिंगण लाखो वारकरी, भाविक आणि नागरिकांच्या साक्षीने भक्तिमय वातावरणात पार पडले. लाल मातीतून झेपावलेल्या मानाच्या अश्वांच्या टापांचा निनाद, ज्ञानोबा-तुकारामच्या जयघोषाने दुमदुमलेला आसमंत, टाळ-मृदंगांचा गजर, पताकांची डौलदार भरारी आणि हरिनामात तल्लीन झालेला वारकरी, या सर्वांमुळे इंदापूर विठ्ठलमय झाले होते.

रयत शिक्षण संस्थेच्या प्रांगणात इंदापूर नगरपरिषदेने शिस्तबद्ध पद्धतीने रिंगणस्थळाची उभारणी केली होती. पालखीचे आगमन होताच, मानाचा नगारा दुमदुमला आणि काही क्षणातच मानाच्या अश्वांनी रिंगणाला प्रदक्षिणा घालत भक्तीच्या सोहळ्याला उत्कर्ष बिंदूवर नेले. त्याक्षणी ‘पुंडलिक वरदे हरी विठ्ठल…,’ ‘ज्ञानोबा-तुकाराम…’च्या जयघोषाने अवघा परिसर भक्तिरंगात न्हाऊन निघाला.

तेणे सुखे माझे निवविले अंग, विठ्ठल हे जग देखियले…।

संत तुकाराम महाराजांच्या या अभंगातील भावार्थ रिंगणाच्या प्रत्येक क्षणात अनुभवायला मिळाला. निमगाव केतकी येथील मुक्कामानंतर पहाटे पादुकांची महापूजा झाली. त्यानंतर हरिनामाच्या गजरात पालखी सोहळा सकाळी ११.२२ वाजता इंदापूरमध्ये दाखल झाला. रिंगणस्थळी सकाळी ११.५४ वाजता पालखीचे आगमन होताच, बालवारकऱ्यांनी पखवाजाचा ठेका धरला. टाळ, चिपळ्या आणि मृदंगांच्या एकसंध लयीने अवघे वातावरण भक्तिमय झाले. प्रत्येक दिंडीने फुगड्या, झिम्मा, उडीचा खेळ आणि पारंपरिक वारकरी खेळ सादर करत संतपरंपरेचा वारसा उलगडला.

मानाच्या अश्वांची कृषिमंत्री दत्तात्रय भरणे आणि माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते पूजा करण्यात आली. पूजा पूर्ण होताच, अश्वांनी प्रदक्षिणा घातली आणि भाविकांच्या मुखातून एकच जयघोष उसळला, पुंडलिक वरदे हरी विठ्ठल !

या भक्तिमय सोहळ्यास सारिका भरणे, नगराध्यक्ष भरत शहा, प्रदीप गारटकर, भाग्यश्री पाटील, अंकिता ठाकरे-पाटील, राजवर्धन पाटील यांच्यासह नागरिक उपस्थित होते.

यंदा प्रथमच वृद्ध, महिला आणि दिव्यांग भाविकांसाठी विशेष प्रेक्षक स्टेडियम उभारण्यात आले. त्यामुळे हजारो भाविकांना सुरक्षित व निवांतपणे रिंगण सोहळ्याचे दर्शन घेता आले. मुख्याधिकारी रमेश ढगे, उपनगराध्यक्ष बाळासाहेब ढवळे, नगरसेवक आणि नगरपरिषदेच्या प्रशासनाने चोख नियोजन केले.

पावसाचा शिडकावा…

इंदापूरच्या गोल रिंगणाची आगळीवेगळी परंपरा यंदाही कायम राहिली. रिंगण सुरू असतानाच पावसाच्या हलक्या सरी बरसल्या. वारकऱ्यांनी त्याकडे विठ्ठलाच्या कृपावर्षावाप्रमाणे पाहिले. या शिडकाव्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाल्याने हरिनामाचा उत्साह अधिकच द्विगुणित झाला.