
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील चिपळूण शहराजवळील पाग परिसरात शनिवारी महावितरणचे लोखंडी खांब वाहून नेणाऱ्या एका वाहनाने अचानक ब्रेक दाबल्यामुळे मागे असलेल्या कारचा भीषण अपघात झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अचानक लागलेल्या ब्रेकमुळे समोरील वाहनातील लोखंडी खांब थेट मागून येणाऱ्या कारच्या काचेतून आरपार आत घुसला. या अत्यंत थरारक आणि गंभीर अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसून एक मोठा अनर्थ टळला आहे, मात्र कारचे प्रचंड नुकसान झाले आहे. या धडकेत वाहनावरील लोखंडी खांब कारच्या पुढील भागातून आरपार घुसल्याने काही काळ परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले.
या भीषण अपघातात कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मात्र, सुदैवाने कारचालक थोडक्यात बचावल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही. घटनेनंतर महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. दरम्यान, लोखंडी अवजड खांबांची वाहतूक करताना आवश्यक सुरक्षेच्या उपाययोजना केल्या होत्या का, असा प्रश्न उपस्थित करत स्थानिक नागरिकांनी संबंधित मॅक्स वाहनचालकाला घेराव घातला. या प्रकारानंतर काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या घटनेमुळे अवजड साहित्याची वाहतूक करताना सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करण्याची गरज पुन्हा अधोरेखित झाली आहे. पोलिसांकडून घटनेची नोंद करून पुढील तपास सुरू आहे.


































































