
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी देशांतर्गत औषध निर्मितीला चालना देण्यासाठी आणि परदेशी कंपन्यांवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. अमेरिकेत आयात केल्या जाणाऱ्या जेनेरिक औषधांवर टप्प्याटप्प्याने तब्बल 200 टक्क्यांपर्यंत आयात शुल्क अर्थात टॅरिफ लादण्याची घोषणा ट्रम्प यांनी केली आहे. अमेरिकेच्या या निर्णयामुळे जगातील औषध निर्यातदार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हिंदुस्थानच्या औषध उद्योगाला मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
1 ऑगस्ट 2026 पासून हे नवीन धोरण लागू केले जाईल. पहिले दोन वर्षे (2026-2028) अमेरिकेत आयात होणाऱ्या सर्व जेनेरिक औषधांवर शून्य टक्के शुल्क राहील. तिसऱ्या वर्षी (2028-29) जेनेरिक औषधांवरील आयात शुल्क थेट 100 टक्के केले जाईल, तर चौथ्या वर्षी (2029 नंतर) हे शुल्क वाढवून 200 टक्के केले जाईल, अशी माहिती डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्रूथ सोशल या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट शेअर करत दिली.
Effective August 1st, 2026, all Generic Drugs being brought into the United States will continue to have a TARIFF of ZERO PERCENT for a two year period of time, after which the TARIFF will be raised to 100% for a one year period of time, and 200% thereafter. This is done in order… pic.twitter.com/hX0citsvLj
— Commentary Donald J. Trump Truth Social Posts On X (@TrumpTruthOnX) July 21, 2026
अमेरिकेत जेनेरिक औषधांचे उत्पादन पुन्हा सुरू व्हावे, हाच या धोरणाचा मुख्य उद्देश आहे. ज्या कंपन्या दिलेल्या मुदतीत अमेरिकेत आपले प्रकल्प आणि यंत्रसामग्री उभारणार नाहीत, त्यांना हा दंड सहन करावा लागेल. अमेरिकन जनतेच्या हिताचे रक्षण करण्यासाठीच हा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, पेटंट असलेल्या, ब्रँडेड किंवा नवनवीन औषधांवरील सध्याचे यशस्वी धोरण जसे आहे तसेच राहील, असेही ट्रम्प यांनी स्पष्ट केले.
हिंदुस्थानवर काय परिणाम होणार?
हिंदुस्थानी औषध उद्योगासाठी अमेरिका ही सर्वात मोठी बाजारपेठ आहे. ट्रम्प यांच्या या निर्णयामुळे हिंदुस्थानी कंपन्यांसमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे. अमेरिकेत वापरल्या जाणाऱ्या एकूण जेनेरिक औषधांपैकी सुमारे 40 टक्के औषधे एकट्या हिंदुस्थानातून पुरवली जातात. ग्लोबल ट्रेड रिसर्च इनिशिएटिव्हच्या अहवालानुसार, आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये हिंदुस्थानने अमेरिकेला 9.7 अब्ज डॉलर (सुमारे 80 हजार कोटी रुपये) मूल्याच्या औषधांची निर्यात केली होती. हिंदुस्थानच्या एकूण औषध निर्यातीत (25.8 अब्ज डॉलर) अमेरिकेचा वाटा तब्बल 38 टक्के आहे. अमेरिकेत उच्च रक्तदाब, मधुमेह, कर्करोग, नैराश्य, संसर्गजन्य आजार आणि मानसिक आरोग्यासाठी हिंदुस्थानी जेनेरिक औषधांचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. फायनान्शियल पोस्ट’च्या अहवालानुसार, 2024 मध्ये अमेरिकेत वापरल्या जाणाऱ्या एकूण गर्भनिरोधक गोळ्यांपैकी तब्बल 65 टक्के पुरवठा ग्लेनमार्क फार्मास्युटिकल्स आणि लुपिन या अव्वल दोन हिंदुस्थानी कंपन्यांकडून केला जात होता.
करारात सवलत मिळण्याचे संकेत, पण…
फेब्रुवारी महिन्यात झालेल्या व्यापार करारानुसार अमेरिकेने जेनेरिक औषधे आणि घटकांबाबत भारताला वाटाघाटीद्वारे सवलत मिळण्याचे संकेत देण्यात आले होते. मात्र, ट्रम्प यांच्या ताज्या घोषणेमुळे या कराराच्या अंमलबजावणीवर आणि हिंदुस्थानी औषध कंपन्यांच्या भविष्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आयात शुल्कातून वाचण्यासाठी हिंदुस्थानी औषध निर्मात्यांना आता अमेरिकेतच आपले उत्पादन प्रकल्प उभारावे लागतील किंवा अमेरिकन बाजारातील औषधांच्या किमती प्रचंड वाढवाव्या लागतील. यामुळे थेट अमेरिकन ग्राहकांच्या खिशावरही ताण पडू शकतो.


























































