CJP चे आंदोलन पेटले; दिल्लीनंतर पाटण्यातही दडपशाही, पोलिसांचा आंदोलकांवर लाठीमार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी दिल्लीतील जंतरमंतरवर सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचे पडसाद आता इतर राज्यांतही पाहायला मिळत आहेत. कॉक्रोच जनता पार्टी (CJP) आणि विविध विद्यार्थी संघटनांच्या वतीने सोमवारी काढण्यात आलेल्या ‘संसद मार्च’दरम्यान पोलिसांनी केलेल्या कारवाईच्या निषेधार्थ आता विरोधी पक्ष मैदानात उतरले आहेत. हे आंदोलन आता बिहारची राजधानी पाटणापर्यंत पोहोचले आहे. पण तिथेही आंदोलक विद्यार्थ्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला आहे.

दिल्लीत विद्यार्थ्यांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ ‘ऑल इंडिया स्टुडंट्स असोसिएशन’ (AISA) या संघटनेने बुधवारी पाटण्यात तीव्र निदर्शने केली. या निदर्शनादरम्यान वातावरण तापले आणि पोलीस व आंदोलकांमध्ये चकमक उडाली. आंदोलकांनी केलेल्या दगडफेकीत काही पोलीस जखमी झाले तर, प्रत्युत्तरा दाखल पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी लाठीमार करत अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या आणि पाण्याच्या फवाऱ्यांचा वापर केला.

यापूर्वी सोमवारी दिल्लीतील ‘संसद चलो’ मार्चदरम्यान पोलीस आणि आंदोलकांमध्ये हिंसक चकमक झाली होती. यामध्ये 100 हून अधिक विद्यार्थी गंभीर जखमी झाले होते. या जखमी विद्यार्थ्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करावे लागले होते. या हिंसारचारानंतर दिल्लीतील सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे.