प्रासंगिक – डॉ. अनंत लक्ष्मण देशमुख

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> दत्तात्रय आरोटे

ज्येष्ठ शिक्षणतज्ञ आणि विद्यार्थ्यांसह अध्यापकांनाही शिक्षणांची नवी दृष्टी देण्याची धडपड करणारे व्यक्तिमत्त्व डॉ. अनंत लक्ष्मण देशमुख आज 75व्या वर्षांत पदार्पण करीत आहेत. त्यानिमित्त…

काही व्यक्तींचे आयुष्य वर्षांनी मोजता येत नाही… ते त्यांच्या कार्याने, त्यांनी घडवलेल्या माणसांनी आणि समाजावर उमटविलेल्या संस्कारांनी मोजावे लागते. डॉ. अनंत लक्ष्मण देशमुख हे असेच एक व्यक्तिमत्त्व.

राष्ट्रपती उत्पृष्ट शिक्षक पुरस्काराने तसेच इतरही अनेक पुरस्कारांनी सन्मानित झालेले देशमुख सर आजही निवृत्तीनंतर तितक्याच जोमाने शाळा, विद्यार्थी आणि शिक्षण व्यवस्थेसाठी कार्यरत आहेत. त्यांच्या पंच्याहत्तरीच्या निमित्ताने हा लेख म्हणजे केवळ शुभेच्छांचा औपचारिक संदेश नाही तर एक कृतज्ञ भावना आहे.

शिक्षक हे केवळ ज्ञानदान करणारे नसतात; ते व्यक्तिमत्त्व घडविणारे शिल्पकार असतात. डॉ. देशमुख सरांनी आपल्या प्रदीर्घ शैक्षणिक कारकिर्दीत हजारो विद्यार्थ्यांचे, शेकडो शिक्षकांचे आणि अनेक शाळांचे भविष्य घडविले. अध्यापन, संशोधन, शाळेचे व्यवस्थापन, शिक्षक प्रशिक्षण, विज्ञान शिक्षण, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा प्रसार, कृत्रिम बुद्धिमत्ते (AI) विषयी जनजागृती, शैक्षणिक लेखन, गुणवत्ता व्यवस्थापन आणि समाजाभिमुख उपक्रम अशा अनेक क्षेत्रांत त्यांनी दिलेले योगदान विलक्षण प्रेरणादायी आहे.

माध्यमिक शिक्षण मंडळ तसेच विविध शैक्षणिक समित्यांवर त्यांनी सदस्य म्हणून उल्लेखनीय कार्य केले. ‘युनिसेफ’च्या Child Friendly Schools प्रक्रियेमध्ये त्यांचा सहभाग आहे. Ednexa संस्थेमध्ये प्रमुख सल्लागार म्हणून त्यांनी उत्पृष्ट कार्य केले आहे. निवृत्तीनंतर विश्रांतीचा मार्ग न स्वीकारता त्यांनी अनेक संस्थांचे व शाळांचे शैक्षणिक सल्लागार म्हणून कार्य सुरू ठेवले आहे. संशोधन क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱया ‘आपणच’ या संस्थेचे ते कार्याध्यक्ष आहेत. लोकसेवा ई-स्पूल, पाषाण व नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिक विद्यालय, फुलगाव या संस्थांमध्ये ते कार्यरत आहेत. अनेक वृत्तपत्रांतून सातत्याने ते शैक्षणिक लेखन करत आहेत. सरस्वती प्रकाशनच्या दहावी दीपोत्सव अंकाचे व राज्य विज्ञान महामंडळाच्या ‘विज्ञान वार्ता’ त्रैमासिकाचे संपादन देशमुख सरांनी केले आहे. आकाशवाणी व दूरदर्शनवर सरांच्या अनेक मुलाखती प्रसारित झाल्या आहेत.

शालेय विद्यार्थ्यांना कृत्रिम बुद्धिमत्ता याविषयी माहिती द्यावी, यासाठी सध्या 16 शाळांतून कार्यक्रम सुरू आहेत. पुण्यधाम ट्रस्टतर्फे सुरू असलेला ‘स्वच्छ सुंदर आरोग्यदायी शाळा’ हा प्रकल्प कोंढवा परिसरातील 25 शाळांमध्ये सुरू आहे. या संपूर्ण प्रकल्पाचे नियोजन, कार्यवाही व परीक्षण सरांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. श्रीमंत दगडूशेट हलवाई ट्रस्ट पुणे शहरातील गरीब आणि होतकरू असे चारशे विद्यार्थी जय गणेश पालकत्व योजनेमध्ये दत्तक घेतलेले आहेत. ही योजना सन 2010मध्ये सुरू झाली. सुरुवातीपासून डॉ. देशमुख सर या योजनेचे प्रमुख म्हणून काम पाहत आहेत. या योजनेमधून अनेक गरीब विद्यार्थ्यांनी शिक्षण घेतले व आज ते उच्च पदावर कार्यरत आहेत. केंद्र सरकारच्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाविषयी शिक्षकांमध्ये व शैक्षणिक संस्थांमध्ये जागरुकता यावी यासाठी महाराष्ट्रात 22 ठिकाणी एकूण 42 व्याख्याने आतापर्यंत सरांनी घेतली आहेत. शिक्षक प्रशिक्षण हा सरांचा अत्यंत आवडीचा विषय आहे. त्यासाठी दरवर्षी सर किमान 15 ते 20 गावांमध्ये नियमितपणे जातात.

माझ्या जीवनात सरांचे स्थान केवळ एक ज्येष्ठ शिक्षणतज्ञ किंवा मार्गदर्शक एवढेच नाही, तर माझे जिवलग मित्र, हितचिंतक आणि ज्येष्ठ बंधू असे आहे. संगमनेरमध्ये विविध शैक्षणिक उपक्रम यशस्वी राबविताना त्यांचे अमूल्य सहकार्य मला लाभले. त्यांच्या विचारांची व्यापकता, नियोजनातील अचूकता आणि प्रत्येक कार्यातील सकारात्मक दृष्टिकोन यामुळे अनेक उपक्रम यशस्वी झाले. माझ्या आयुष्यातील एक महत्त्वाचा टप्पा म्हणजे माझा महाराष्ट्र राज्य विज्ञान अध्यापक महामंडळाशी आलेला संबंध. त्या प्रवासाला सरांची प्रेरणा आणि विश्वास हेच सर्वात मोठे कारण होते. त्यांच्या प्रोत्साहनामुळे मला महामंडळात कार्य करण्याची संधी मिळाली आणि त्या कार्यातून मला राज्यभरातील शिक्षकांशी जोडले जाण्याचे भाग्य मिळाले. डॉ. देशमुख सरांचे ज्ञानदानाचे, शिक्षण क्षेत्राला दिशा देण्याचे आणि शिक्षकांना नवी दृष्टी देण्याचे कार्य यापुढेही असेच सुरू राहो.