अरिजीत सिंह पुन्हा प्लेबॅक सिंगिंगमध्ये? ‘आवारापन 2’च्या नव्या गाण्यामुळे चर्चांना उधाण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बॉलिवूडमधील लोकप्रिय गायक अरिजीत सिंह यांनी यंदाच्या सुरुवातीला प्लेबॅक सिंगिंगमधून निवृत्ती जाहीर केल्याची चर्चा रंगली होती. मात्र आता त्यांच्या पुनरागमनाच्या बातम्यांनी चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. अभिनेता इमरान हाश्मीच्या आगामी ‘आवारापन 2’ चित्रपटातील नव्या गाण्याला अरिजीत यांनी आवाज दिल्याचा दावा समोर आला असून, त्यामुळे त्यांच्या निवृत्तीच्या निर्णयाबाबत पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.

 

माध्यमांतील वृत्तांनुसार, आवारापन 2 चित्रपटाचे टायटल ट्रॅक असून ते 21 जुलै रोजी सर्व प्रमुख म्युझिक स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. या गाण्याला संगीतकार अमाल मलिक यांनी संगीत दिले असून गीतकार रश्मी विराग यांनी गीतलेखन केले आहे. यापूर्वी चित्रपटातील ‘वे जुनून’ हे गाणे प्रदर्शित झाले असून त्यालाही प्रेक्षकांची चांगली पसंती मिळाली आहे.

 

वृत्तांनुसार, आवारापन 2 चे निर्माता विशेष भट्ट यांच्या विनंतीवरून अरिजीत यांनी हे गाणे गायले आहे. विशेष फिल्म्स आणि अरिजीत सिंह यांचे जवळपास 15 वर्षांचे जुने व्यावसायिक नाते आहे. मर्डर 2 मधील ‘फिर मोहब्बत’ या गाण्याद्वारे विशेष फिल्म्सनेच अरिजीत यांना मोठी संधी दिली होती.

 

मात्र अरिजीत सिंह यांनी प्लेबॅक सिंगिंगमधील निवृत्तीचा निर्णय अधिकृतपणे मागे घेतल्याची कोणतीही पुष्टी अद्याप झालेली नाही. त्यामुळे आवारापन 2 मधील हे गाणे त्यांनी निवृत्तीच्या घोषणेपूर्वीच रेकॉर्ड केले असण्याचीही शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे अरिजीत खरोखरच पुन्हा प्लेबॅक सिंगिंगमध्ये सक्रिय झाले आहेत की हा केवळ आधीच रेकॉर्ड केलेला ट्रॅक आहे, याबाबत अधिकृत घोषणेची चाहत्यांना प्रतीक्षा आहे.