
फिफा वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यानंतर स्पेन आणि अर्जेंटिना संघातील खेळाडूंमध्ये झालेल्या धक्काबुक्की व वादाची फिफाने अधिकृत चौकशी सुरू केली आहे. चौकशीत दोषी आढळणाऱ्या खेळाडूंवर किमान तीन अधिकृत सामन्यांची बंदी घालण्यात येण्याची शक्यता आहे. मीडिया अहवालानुसार, फिफाच्या शिस्तपालन समितीने या प्रकरणाच्या तपासासाठी शिस्तभंग व आचारसंहिता तपास अधिकारी नियुक्त केला असून, संभाव्य नियमभंगाची सखोल चौकशी केली जाणार आहे.
विजयानंतर जल्लोष अन मैदानावरच वाद
न्यू जर्सी येथील स्टेडियमवर झालेल्या अंतिम सामन्यात स्पेनने अर्जेंटिनाचा 1-0 असा पराभव करून विश्वविजेतेपद पटकावले. सामन्यानंतर स्पेनच्या विजयोत्सवादरम्यान अर्जेटिनाचे लिएंड्रो परेडेस आणि थियागो अल्माडा यांचा स्पेनचा मिडफिल्डर गावी याच्याशी वाद झाला आणि त्याचे रूप धक्काबुक्कीत झाले. या गोंधळात लिएंड्रो परेडेस याने स्पेनचा बचावपटू एरिक गार्सिया याची मान पकडल्याचा आरोप आहे. तसेच नाहुएल मोलिना याने स्पेनचा स्टार मिडफिल्डर रोद्री याच्यावर ठोसा मारण्याचा प्रयत्न केल्याचाही आरोप करण्यात आला आहे. याशिवाय निकोलस ओटामेंडी आणि रोद्री यांच्यात तीव्र शाब्दिक चकमक झाली. अर्जेंटिनाचे सहाय्यक प्रशिक्षक रोबर्टो आयाला आणि स्पेनचा खेळाडू दानी ओल्मो यांच्यातही वाद झाल्याचे समोर आले आहे.
तीन सामन्यांच्या बंदीची शक्यता
फिफाच्या शिस्तपालन संहितेतील कलम १४ नुसार, हिंसक वर्तन सिद्ध झाल्यास संबंधित खेळाडूंना किमान तीन अधिकृत सामन्यांसाठी निलंबित केले जाऊ शकते, याशिवाय दंडात्मक कारवाई आणि अर्जेटिना फुटबॉल असोसिएशनविरोधातही शिस्तभंगाची कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.





























































