घोडाझरी उपकालवा पहिल्याच दिवशी फुटला, बांधकामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

तब्बल 15 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर गोसेखुर्द प्रकल्पाच्या घोडाझरी उपकालव्यात प्रथमच पाणी सोडण्यात आले. चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी, नागभीड व सिंदेवाही तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला. मात्र हा आनंद अवघ्या काही तासांचाच ठरला. पाणी सोडल्यानंतर अवघ्या दहा तासांत नागभीड तालुक्यातील ओवाळा गावानजीक घोडाझरी उपकालवा फुटल्याने हजारो लिटर पाणी शेतांमध्ये घुसले. धानपिकांसह इतर पिकांना फटका बसण्याची भीती निर्माण झाली असून मोठ्या प्रमाणात पाण्याची नासाडी झाली आहे.

 

View this post on Instagram

 

विशेष म्हणजे, सुमारे 15 वर्षे सुरू असलेल्या या कालव्याचे काम मागील वर्षी पूर्ण झाल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र पहिल्याच दिवशी कालवा फुटल्याने कामाच्या गुणवत्तेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. पावसाच्या उशिरामुळे आधीच संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांनी सिंचनासाठी कालव्यात पाणी सोडण्याची मागणी केली होती. पण पाणी आल्यानंतर लगेचच कालवा फुटल्याने शेतकऱ्यांच्या अपेक्षांवर पाणी फिरल्याची भावना व्यक्त होत आहे. घटनेनंतर संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत कालव्यातील पाणी बंद केले. मात्र फुटलेल्या ठिकाणातून रात्रभर पाणी शेतांमध्ये वाहत राहिल्याची माहिती आहे.