
केदारनाथ मार्गावर बुधवारी दरड कोसळल्याने यात्रा तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे. मुसळधार पावसामुळे रुद्रप्रयाग येथील गौरीकुंडपासून एक किलोमीटर अंतरावर छोडीजवळ दरड कोसळली. मोठे दगड आणि खडक कोसळल्याने मार्ग बंद झाला. प्रशासनाने बाधित क्षेत्रातील यात्रा थांबवली असून भाविकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.
इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, दरड कोसळल्याची माहिती मिळताच भाविकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले. सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD) आणि इतर विभागांची पथके घटनास्थळी पोहोचली असून, मार्ग पूर्ववत करण्यासाठी ढिगारा हटवण्याचे काम सुरू आहे, असे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी नंदन सिंह राजवार यांनी सांगितले.
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण व पोलीस पथकांकडून मदत व सुरक्षा कार्य सुरू आहे. गरज भासल्यास राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF) आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दल (SDRF) यांनाही सज्ज ठेवण्यात आले आहे.





























































