आपल्या आरोग्यासाठी RO चे पाणी किती उपयोगी ठरते, जाणून घ्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

 

पावसाळ्यात दुषित पाण्यामुळे आपल्या आरोग्यास नुकसान पोहोचते. त्यामुळेच पावसाळ्याच्या दिवसांमध्ये अनेकजण पाणी गाळून उकळून पितात. परंतु अनेक घरांमध्ये RO असल्याने हे पाणी पिणे सर्वात सुरक्षित मानले जाते. आजकाल बहुतांश घरांमध्ये RO (रिव्हर्स ऑस्मोसिस) वॉटर प्युरिफायरचा वापर केला जातो. मात्र RO पाण्याबाबत अनेक गैरसमज समाजात पसरलेले आहेत. काहीजण RO पाणी सर्वात सुरक्षित मानतात, तर काहींच्या मते ते शरीरासाठी हानिकारक असते. तज्ज्ञांच्या मते, या दोन्ही टोकाच्या समजुती चुकीच्या असून पाण्याच्या गुणवत्तेनुसारच RO ची गरज ठरते.

जागतिक आरोग्य संघटना (WHO) नुसार, RO प्रक्रियेमुळे पाण्यातील काही खनिजे कमी होऊ शकतात, मात्र त्यामुळे शरीरात आवश्यक खनिजांची कमतरता निर्माण होते, असे नाही. कारण कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि इतर आवश्यक खनिजांचा मुख्य स्रोत संतुलित आहार असतो. तसेच प्रत्येक घरात RO बसवणे गरजेचे नसते. जर स्थानिक पाणी सुरक्षित आणि चांगल्या गुणवत्तेचे असेल, तर इतर प्रकारचे वॉटर प्युरिफायरही पुरेसे ठरू शकतात.

RO पाणी शुद्ध असले तरी ते स्वच्छ आणि झाकण असलेल्या भांड्यात साठवणे आवश्यक आहे. चुकीच्या पद्धतीने साठवले तर ते पुन्हा दूषित होऊ शकते. तसेच RO पाणी आतड्यांचे आरोग्य बिघडवते, या दाव्यालाही सध्या कोणतेही ठोस वैज्ञानिक पुरावे नाहीत. पाण्यात TDS जास्त असल्यास किंवा आर्सेनिक, फ्लोराइड, शिसे यांसारखे घातक घटक असल्यास RO उपयुक्त ठरू शकतो. योग्य देखभाल, वेळेवर फिल्टर बदलणे आणि संतुलित आहार घेणे हे सुरक्षित आरोग्यासाठी तितकेच महत्त्वाचे आहे.