
आपल्या खाद्यसंस्कृतीमध्ये मीठाचे महत्त्व हे फार अबाधित आहे. मीठामुळे पदार्थांची लज्जत वाढण्यास मदत होते. मीठ नसल्यास जेवणाला चवच लागत नाही. त्यामुळेच मीठ हा आपल्या खाद्यसंस्कृतीचा महत्त्वाचा भाग आहे.
अन्नाची चव वाढवण्यासाठी मीठ आवश्यक असले, तरी त्याचे अतिसेवन आरोग्यासाठी घातक ठरू शकते. अनेकजण स्वयंपाकात घातलेल्या मिठाबरोबरच पॅकेज्ड पदार्थ, चिप्स, नमकीन, लोणची आणि फास्ट फूडमधूनही मोठ्या प्रमाणात सोडियम घेत असतात. त्यामुळे नकळत शरीरात आवश्यकतेपेक्षा जास्त मीठ जाते. तज्ज्ञांच्या मते, दीर्घकाळ जास्त मीठ खाल्ल्यास उच्च रक्तदाब, हृदयविकार, स्ट्रोक आणि मूत्रपिंडाशी संबंधित आजारांचा धोका वाढू शकतो.
बहुतांश प्रौढांनी दिवसाला सुमारे एक चमचा मीठ, यापेक्षा जास्त सेवन करू नये. उच्च रक्तदाब, हृदयविकार किंवा किडनीच्या समस्यांनी त्रस्त असलेल्या व्यक्तींनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार यापेक्षा कमी मीठ घ्यावे. फक्त स्वयंपाकात वापरलेल्या मिठावर लक्ष ठेवणे पुरेसे नसून, प्रक्रिया केलेल्या अन्नपदार्थांमधील सोडियमचाही विचार करणे आवश्यक आहे.
मीठाचे प्रमाण कमी करण्यासाठी घरचे ताजे अन्न खाण्यावर भर द्यावा. पदार्थांना चव आणण्यासाठी लिंबू, कोथिंबीर, आले, लसूण किंवा इतर मसाल्यांचा वापर करता येतो. खरेदी करताना अन्नपदार्थांवरील न्यूट्रिशन लेबल तपासून कमी सोडियम असलेले पर्याय निवडावेत. तसेच जेवणाच्या टेबलावर अतिरिक्त मीठ ठेवणे टाळावे आणि हळूहळू मीठाचे प्रमाण कमी करण्याची सवय लावल्यास आरोग्याचे अनेक धोके टाळता येऊ शकतात.





























































