
नीट (NEET) पेपरफुटीप्रकरणी उपोषणाला बसलेले शिक्षणतज्ज्ञ आणि सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी रुग्णालयातून सरकारला पत्र लिहून उपोषण सोडण्यासाठी अट घातली आहे. या आंदोलनात सहभागी झालेल्या कोणत्याही तरुण आंदोलकांवर कोणतीही कायदेशीर किंवा सूडबुद्धीची कारवाई केली जाणार नाही, असे स्पष्ट आश्वासन सरकारने दिले तर आपण उपोषण मागे घेण्यास तयार असल्याचे त्यांनी या पत्रात नमूद केले आहे.
AN APPEAL TO THE GOVERNMENT
regarding breaking my fast…
Once the assurance from govt come I will also appeal to the peacefully protesting students to halt the movement for now and enter into dialogue with the government pic.twitter.com/gR6S8woF5R— Sonam Wangchuk (@Wangchuk66) July 22, 2026
केंद्रीय मंत्र्यांसोबत झालेल्या चर्चेदरम्यान सरकारने त्यांच्या मागण्यांवर सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन दिले होते. यामध्ये पेपरफुटी प्रकरणामुळे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबांना योग्य भरपाई देणे, संसदेत उत्तरदायित्व निश्चित करण्यासाठी अर्थपूर्ण चर्चा करणे आणि केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याच्या मुद्द्यावर विचार करणे या बाबींचा समावेश होता. तसेच पोलिसांची दडपशाही आणि अतिरिक्त बळाच्या वापराच्या घटना घडल्यानंतरही २० जुलै रोजी काढण्यात आलेला ‘चलो संसद’ मार्च अत्यंत शांततापूर्ण मार्गाने पार पडला, असे सांगत देशाने आंदोलकांचा संयम आणि लोकशाहीवरील विश्वास पाहिला असल्याचे वांगचुक यांनी पत्रात नमूद केले आहे.
उपोषणादरम्यान विविध राजकीय पक्षांच्या सुमारे ६५ खासदारांनी पत्र लिहून आणि प्रत्यक्ष भेटून वांगचुक यांना उपोषण सोडण्याची विनंती केली आहे. देशाच्या सेवेसाठी अजून खूप काम करायचे असल्याने आपणही उपोषण मागे घेऊन कामावर परतण्यास उत्सुक आहोत. मात्र, ज्या तरुणांसाठी हे आंदोलन सुरू झाले त्यांच्या भवितव्यासाठी हे शक्य नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. केवळ उत्तरदायी शिक्षण व्यवस्थेसाठी आवाज उठवणाऱ्या या तरुणांवर कोणतीही कारवाई होणार नाही, अशी हमी सरकारने दिल्यास लाखो तरुणांच्या आकांक्षा पूर्ण झाल्याच्या विश्वासाने आपण उपोषण सोडण्यास तयार असल्याचे वांगचुक पत्राच्या शेवटी म्हणाले.






























































