सामना अग्रलेख – क्रांती! मोदी-शहा चले जाव!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सर्व हरामखोर व नालायक मंत्र्यांना पाठीशी घालून देश बरबाद करण्याचा ‘द्रोह’ मोदी करत आहेत. म्हणून लाखो ‘झुरळे’ संसद भवनावर धडक देऊन मोदी यांचा राजीनामा मागत आहेत. हीच आता क्रांतीची सुरुवात आहे. लाखो झुरळे क्रांतीच्या दिशेने एक एक पाऊल पुढे टाकत आहेत. केंद्रीय मंत्र्यांची मुले परदेशातील विद्यापीठांत शिकत आहेत. मोठ्या पगाराच्या नोकऱ्या करीत आहेत, पण लाखो बेरोजगार झुरळांनी या मुलांच्या बापांची झोप उडवली आहे. झुरळे त्यांच्या घरात घुसतील. प्रधानमंत्री कार्यालयात, गृहमंत्रालयात, शिक्षण मंत्रालयात, सर्वोच्च न्यायालयात, राज भवनात घुसतील. झुरळांनी बंड पुकारले आहे. मोदी-शहा चले जाव!

देशभरात मोदी यांच्या विरोधात जनक्षोभ उसळून आला आहे. एक बेमुर्वतखोर हुकूमशहा व त्यांच्या झुंडटोळीविरुद्ध राज्याराज्यांतील युवाशक्ती रस्त्यावर उतरली आहे. ‘तानाशाही नही चलेगी’, ‘मोदी सत्ता सोडा’ अशा गर्जना देशातील रस्त्यारस्त्यांवर ऐकू येत आहेत. जनतेने भय, अंधभक्तीचे ओझे फेकून दिले असेल आणि निर्भयतेची कवचकुंडले घालून रस्त्यावर उतरण्याचे ठरवले असेल तर मोदी सरकारचे तुरुंगही कमी पडतील आणि बंदुकीच्या गोळ्याही कमी पडतील, असे संतप्त वातावरण दिसू लागले आहे. सोमवारी संसद भवनावर निघालेला प्रचंड मोर्चा 56 इंची छातीवाल्यांचे पाय लटपटवणारा आहे. या मोर्चावर पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. भयंकर लाठीमार केला. बंदुका रोखल्या तरी तरुण मागे हटले नाहीत. या आंदोलनाने मोदी-शहांचा अहंकार धुळीस मिळवला आहे. या संतप्त जनक्षोभाचे जनक हे सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश सूर्य कांत आहेत. बेरोजगार तरुणांना ‘झुरळा’ची उपमा देऊन सरन्यायाधीश सूर्य कांत यांनी तरुणांच्या असंतोषाला तोंड फोडले. तरुण वर्ग मोदी राज्यात ‘हेच आपले भाग्य व मोदीच आपले भगवान’ या भूमिकेत जगत होता. मात्र प्रत्यक्षातील त्यांचे जगणे हे नोकरी नाही, हाताला काम नाही, घर नाही, प्रतिष्ठा नाही असे झुरळासारखेच झाले होते, अर्थात झुरळे अत्यंत कठीण परिस्थितीतही तग धरून राहतात. जगाचा अंत होईल, तेव्हाही जे दोन-चार जीव ‘जिवंत’ राहतील असे शास्त्रज्ञांना वाटते त्यात ‘झुरळ’ या महान जिवाचा समावेश आहे. अशा झुरळांचे भय पंतप्रधान मोदी व त्यांच्या सरकारला वाटू लागले आहे. सोनम वांगचुक यांनी या ‘झुरळां’चे नेतृत्व स्वीकारले व ते ‘जंतर मंतर’वर निर्णायक लढ्यासाठी उपोषणाला बसले. अयोध्येच्या राम मंदिरात मोदी यांनी सात-आठ दिवसांचा ‘उपवास’, ‘क्रत’ केले तसे हे (ढेकर देत केलेले) उपोषण नव्हते. भारतीय जनता पक्षाच्या एकाही पुढाऱ्याने देशाच्या स्वातंत्र्यासाठी किंवा

राष्ट्रकार्यासाठी उपोषण

केल्याची नोंद नाही. त्यामुळे उपोषण किती तेजस्वी असते हे त्यांना कधीच समजणार नाही. वांगचुक यांचे उपोषण काय पाच मिनिटांत चिरडू असा त्यांचा अहंकार होता, पण वांगचुक यांचे उपोषण 20 दिवस चालले व ते बलिदानासाठी सज्ज झाले तेव्हा 56 इंचवाल्यांची धांदल उडाली. त्यांनी वांगचुक यांना उचलले व रुग्णालयात नेले. मात्र त्याबरोबरच देशभरात असंतोषाचा वणवा पेटून लाखो झुरळे दिल्लीतील ‘जंतर मंतर’वर जमली. त्यांनी ‘इन्कलाब’चे नारे द्यायला सुरुवात केली. मोदी सरकारविरोधात घोषणा सुरू झाल्या. वांगचुक इस्पितळात व ‘जंतर मंतर’वर झुरळांची अलोट गर्दी हे चित्र सरकारचे चित्त विचलित करणारे आहे. मोर्चाने तर थेट संसद भवनालाच धडक दिली. मुंबईत आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवाजी पार्कला हजारो झुरळांनी गर्दी केली. महाराष्ट्रातील नागपूर, पुण्यात हजारो झुरळे रस्त्यावर उतरून वांगचुक यांचे समर्थन करीत आहेत. ‘जंतर मंतर’वर गर्दी वाढत आहे. देशातल्या विविध भागांतून झुरळांच्या आंदोलनाच्या बातम्या येत असल्या तरी शिक्षणाचे मंदिर भ्रष्ट करणाऱ्या धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घ्यायला मोदी तयार नाहीत. धर्मेंद्र प्रधान असे कोण लागून गेले आहेत? ते काय सरकारचे जावई आहेत की मोदी यांचे मानसपुत्र? ते कुणाचे कोणीही असोत, त्यांनी भारतीय तरुणांचे जीवन उद्ध्वस्त केले आहे. ‘नीट’ परीक्षेचे पेपर फोडण्याची जबाबदारी प्रधानांच्याच शिरावर येते व त्याची शिक्षा त्यांना मिळायला हवी. मोदी ‘एपस्टीन’ प्रकरणात अडकलेल्या हरदीप पुरी यांचा राजीनामा घेत नाहीत. अर्थव्यवस्थेचे धिंडवडे काढणाऱ्या निर्मला सीतारामन यांचा राजीनामा घेत नाहीत. चीनने लडाखमध्ये जमीन गिळली तरी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचा राजीनामा घेत नाहीत. न्यायव्यवस्था बाजारात

लिलावासाठी उपलब्ध

आहे तरी सरन्यायाधीश आणि कायदा मंत्र्यांचा राजीनामा घेत नाहीत. संविधानाच्या 10 व्या अनुच्छेदात ‘फूट’ आणि पक्षांतराला मान्यता नसतानाही लोकसभा अध्यक्ष ‘गद्दार’ खासदारांच्या गटाला मान्यता देत आहेत. या संविधानद्रोहाविरुद्ध लोकसभा अध्यक्षांचा राजीनामा घेत नाहीत. देशाचे परराष्ट्र धोरणदेखील पूर्ण फसले असले तरी त्या खात्याचे मंत्री जयशंकर यांचा राजीनामा मोदी घेत नाहीत. अयोध्येतील राम मंदिर लुटले जात आहे तरी मोदी राम मंदिर न्यासाचा राजीनामा घेत नाहीत. देशात कायदा-सुव्यवस्थेच्या नावाने अराजक पेटले आहे, मणिपूर जळत आहे, भ्रष्टाचार टोकाला गेला आहे, केंद्रीय तपास यंत्रणा, निवडणूक आयोगाने लाज सोडली आहे, तरी गृहमंत्री अमित शहांचा राजीनामा मोदी घेत नाहीत. या सर्व हरामखोर व नालायक मंत्र्यांना पाठीशी घालून देश बरबाद करण्याचा ‘द्रोह’ मोदी करत आहेत. म्हणून लाखो झुरळे संसद भवनावर धडक देऊन मोदी यांचा राजीनामा मागत आहेत. हीच आता क्रांतीची सुरुवात आहे. मोदी हे पंतप्रधान म्हणून त्यांच्या कर्तव्यास मुकले आहेत. हा देशद्रोह आहे. मोदी हे 12 वर्षांत 12 लाख वेळा देशाशी खोटे बोलले आहेत. त्यांनी निर्माण केलेल्या अंधभक्तांनी लोकशाहीची प्रतिष्ठा नष्ट केली. देशातील निवडणुका आणि निकाल चोरण्यात आले. मोदी यांचा भंपकपणा उघडा पडला आहे. सोनम वांगचुक यांच्या नेतृत्वाखाली लाखो झुरळे क्रांतीच्या दिशेने एक एक पाऊल पुढे टाकत आहेत. याक्षणी जय शहा कोठे आहेत? ते नक्कीच परदेशात सुरक्षित आहेत. केंद्रीय मंत्र्यांची मुले परदेशातील विद्यापीठांत शिकत आहेत. मोठ्या पगाराच्या नोकऱ्या करीत आहेत, पण लाखो बेरोजगार झुरळांनी या मुलांच्या बापांची झोप उडवली आहे. झुरळे त्यांच्या घरात घुसतील. प्रधानमंत्री कार्यालयात, गृहमंत्रालयात, शिक्षण मंत्रालयात, सर्वोच्च न्यायालयात, राज भवनात घुसतील. तुमचे जगणे मुश्कील करतील. झुरळांनी बंड पुकारले आहे. मोदी-शहा चले जाव!