ठसा – कुमार सप्तर्षी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

<< जयंत माईणकर
(ज्येष्ठ पत्रकार)

महाराष्ट्राच्या समाजवादी चळवळीत आणि आणीबाणीविरोधी लढ्यात ज्यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते, असे डॉ. कुमार सप्तर्षी हे युवक क्रांती दलाचे (युक्रांद) संस्थापक-नेते म्हणून महाराष्ट्राला परिचित आहेत. साने गुरुजी आणि विनोबा भावे यांच्या विचारांचा वारसा पुढे नेत, समाजवादी-गांधीवादी मूल्यांशी बांधिलकी राखत त्यांनी आयुष्यभर सामाजिक आंदोलनांचे नेतृत्व केले. डॉ. कुमार गणेश सप्तर्षी यांचा जन्म 21 ऑगस्ट 1941 रोजी झाला. पुण्याशी त्यांचे कार्यक्षेत्र प्रामुख्याने जोडलेले राहिले. त्यांचे शिक्षण आणि सामाजिक जडणघडण याच शहरात झाली. लहानपणापासूनच समाजातील विषमता, शोषण आणि अन्याय यांच्या विरोधात त्यांच्या मनात चीड निर्माण झाली, जी पुढे त्यांच्या संपूर्ण सार्वजनिक जीवनाची दिशा ठरली.

युवक क्रांती दलाची स्थापना

1970च्या दशकाच्या सुरुवातीला डॉ. सप्तर्षी यांनी काही समविचारी तरुण कार्यकर्त्यांसह ‘युक्रांद’ या संघटनेची स्थापना केली. या संघटनेचे मूळ उद्दिष्ट होते – तरुणांना सामाजिक व राजकीय परिवर्तनाच्या चळवळीत सक्रिय सहभागी करून घेणे. आक्रमक अहिंसा हे या संघटनेचे वैशिष्ट्यपूर्ण तत्त्व राहिले – म्हणजे अन्यायाविरोधात ठाम आणि आक्रमक भूमिका घेताना हिंसेचा मार्ग मात्र कधीही स्वीकारायचा नाही.

आणीबाणीविरोधातील लढा

1975 ते 1977 या आणीबाणीच्या काळात डॉ. सप्तर्षी आणि युक्रांदचे असंख्य कार्यकर्ते तुरुंगात गेले. लोकशाही मूल्यांची पायमल्ली होत असताना त्यांनी घेतलेली ठाम भूमिका आणि सोसलेला तुरुंगवास हा त्यांच्या सार्वजनिक जीवनातील एक निर्णायक टप्पा ठरला. आणीबाणी उठल्यानंतर देशभर लोकशाही पुनर्स्थापनेसाठी जोजनआंदोलनाचा उठाव झाला, त्यात युक्रांदच्या कार्यकर्त्यांचे योगदान महत्त्वाचे राहिले. आणीबाणीनंतर संघटनेत काहीशी फूट पडली आणि डॉ. सप्तर्षी यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी प्रत्यक्ष संसदीय राजकारणात उतरण्याचा निर्णय घेतला. त्यांनी जनता पक्षात प्रवेश करून निवडणुकीच्या राजकारणातही सहभाग नोंदवला. डॉक्टर एक वेळ आमदार होते. त्या काळात शरद पवार मुख्यमंत्री होते. शरद पवार आणि त्यांचे संबंध जवळचे एकेरीतील होते. मात्र निव्वळ सत्तेच्या राजकारणापेक्षा त्यांचा मूळ ओढा सामाजिक आंदोलनांकडेच अधिक राहिला.

डॉ. सप्तर्षी यांनी आपल्या प्रदीर्घ सार्वजनिक कारकीर्दीत अनेक सामाजिक प्रश्नांवर आंदोलने उभारली. मग तो आदिवासींच्या जमीन हक्कांचा प्रश्न असो, कामगार-हमालांच्या न्याय्य मागण्यांचा प्रश्न असो की सामाजिक ऐक्य आणि हिंदू-मुस्लीम सलोख्याचा विषय असो. बाबा आढाव यांच्यासारख्या समविचारी सामाजिक नेत्यांसोबत त्यांनी अनेक चळवळींत खांद्याला खांदा लावून काम केले. 2001 साली युवक क्रांती दलाची पुनर्स्थापना झाली आणि डॉ. सप्तर्षी पुन्हा एकदा संघटनेच्या केंद्रस्थानी सक्रिय झाले. शेवटपर्यंत ते या संघटनेचे अध्यक्ष होते.

गांधीवाद, समाजवाद आणि सर्वोदय विचारांची सांगड घालत डॉ. सप्तर्षी यांनी आपली वेगळी वैचारिक भूमिका कायम ठेवली. सामाजिक ऐक्य, धर्मनिरपेक्षता आणि तळागाळातील समाजाचे प्रश्न हे त्यांच्या विचार-लेखनाचे केंद्रबिंदू राहिले. विविध परिसंवाद, चर्चासत्रे आणि सामाजिक व्यासपीठांवरून त्यांनी आपली भूमिका सातत्याने मांडली.

डॉ. सप्तर्षी यांच्या 81व्या वर्षात पदार्पणानिमित्त 2021मध्ये त्यांच्या बहुआयामी कार्याचा वेध घेणारा ‘डॉ. कुमार सप्तर्षी ः व्यक्ती आणि कार्य’ हा गौरव ग्रंथ डॉ. अंजली सोमण यांनी संपादित करून प्रकाशित केला. या ग्रंथातून त्यांच्या कार्याचा आणि विचारांचा साकल्याने आढावा घेण्यात आला. त्यांच्या पत्नी ऊर्मिलाताई या प्राध्यापिका होत्या. त्यांनीही कुमार यांच्या खांद्याला खांदा लावून समाजसेवेत झोपून दिले. त्याचबरोबर कुमार यांचा संसारही त्यांनी सांभाळला. कबीर हा त्यांचा मुलगा आज इंग्लंडला cardiologist म्हणून प्रसिद्ध आहे. डॉ. कुमार सप्तर्षी यांचे जीवन म्हणजे तत्त्वनिष्ठा आणि सामाजिक बांधिलकी यांचा दुर्मीळ संगम आहे. सत्तेच्या राजकारणापासून काहीशी फारकत घेत आयुष्यभर सामान्य माणसाच्या हक्कांसाठी रस्त्यावर उतरणारा हा कार्यकर्ता महाराष्ट्राच्या सामाजिक-राजकीय इतिहासातील एक आदरणीय नाव आहे. त्यांचा लोकसंग्रह आणि लोकांप्रति असलेली आस्था हीच त्यांची खरी जीवनसंपत्ती म्हटली पाहिजे.