दिल्ली डायरी – पावसाळी अधिवेशनावर संघर्षाचे ढग

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

<< नीलेश कुलकर्णी
[email protected]

अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या दानपेटीतील चोरी व खासदार चोरीवरून विरोधक मोदी सरकारला या अधिवेशनात धारेवर धरणार हे निश्चित आहे. संसदेच्या आजपासून सुरू होणाऱ्या पावसाळी अधिवेशनावर याच गदारोळाचे व संघर्षाचे ढग दाटून आले आहेत. त्यासोबत इतरही अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर विरोधकांना रान उठवावे लागणार आहे. विरोधकांनी या अधिवेशनातील रणकंदन जिंकले तर 2029 मधील भाजपचे सत्तेचे दरवाजे कायमचे बंद होतील.

राम मंदिरातील दानपेटी चोरी व खासदार चोरीबरोबरच नीट परीक्षांसह देशातील शिक्षण व्यवस्थेची धर्मेंद्र प्रधान यांनी लावलेली वाट, इथेनॉलबाबत नितीन गडकरींनी सुरू केलेली सक्ती या मुद्द्यांवरून संसदेच्या पावसाळी अधिवेशनात गोंधळ निश्चित आहे. कितीही गडबड घोटाळे करा, मोदींच्या राज्यात राजीनामा होत नाही. ही परंपरा बदलण्यास विरोधक सरकारला बाध्य करतात का? ते पाहावे लागेल.

संसदेचे पावसाळी अधिवेशन आजपासून सुरू होत आहे. संसदेच्या विशेष अधिवेशनापासून ते पावसाळी अधिवेशनापर्यंत ‘राजकीय पुला’खालून बरेच पाणी वाहून गेले आहे आणि या पाण्यात भाजपचे बेगडी हिंदुत्वही. राम मंदिर निर्माण हा भारतीय जनतेच्या आस्थेचा व चळवळीचा विषय आहे. अयोध्येत प्रभू रामाचे भव्य मंदिर व्हावे, यासाठी घराघरांतील भावना जोडल्या गेल्या होत्या.

प्रत्येकाने आपापल्या परीने त्यासाठी योगदान दिले. अगदी कष्टकरी बायाबापड्यांनीही योगदान दिले. त्या योगदानावरही भाजपप्रणित ‘चंपतां’नी डल्ला मारला. पूर्वाश्रमीचे शिवसैनिक माजी आमदार पवनकुमार पांडे यांनी हे प्रकरण बाहेर काढले नसते तर भाविकांसोबत भाजपप्रणित मंडळींनी रामालाही गंडवणे सुरूच ठेवले असते. पांडेंनी पुढाकार घेतला व समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव यांनी आवाज उठवला. त्यामुळे दानपेटीत घोटाळा झाला हे तरी भाजप सरकारने मान्य केले. योगी आदित्यनाथांनी ‘एसआयटी’ नेमली. पण त्यातून काय बाहेर येणार? चंपतराय हे नरेंद्र मोदी व अमित शहा यांचे निकटवर्तीय मानले जातात. भाजपमधील ‘बनिया लॉबी’चे मोदी-शहा हे आधारवड आहेत. त्यामुळे मोदी व शहा यांना राम मंदिर लुटीतील पैन्पैचा हिशेब द्यावा लागेल. त्यासाठी विरोधकांना रान उठवावे लागेल. हा एकच मुद्दा विरोधकांनी व्यवस्थितपणे लावून धरला तर 2029 मधील भाजपचे सत्तेचे दरवाजे कायमस्वरूपी बंद होतील.

उत्तर प्रदेशात तर भाजपचा ‘करेक्ट कार्यक्रम’ या मुद्द्यामुळे होणारच आहे. भाजपचे हिंदुत्व कसे बेगडी आहे, याचा पर्दाफाश करण्याची एक मोठी संधी विरोधकांकडे आहे. ‘मंदिर वही बनायेंगे’चा नारा देत दोन खासदार संख्येपासून प्रचंड बहुमताकडे भाजपची वाटचाल झाली ती रामाच्या भरवशावर. अशा रामाच्याच दानपेटीवर टाकलेला दरोडा भाजपला महागात पडणार आहे. पुन्हा भाजप खासदार संख्या दोनवर जाऊ शकते. फक्त त्यासाठी विरोधकांनी रान उठवायला हवे. विरोधक ते करतील का हे पाहावे लागेल. बाकी पाशवी बहुमताचा जुगाड करून त्या जोरावर मतदार परिसीमन विधेयक मंजूर करण्याचा सरकारचा प्रयत्न राहील, त्यात सरकार यशस्वी होईल का, हेही पाहावे लागेल.

चंपत राय गेले, पुढे काय?

राम मंदिर दानपेटी घोटाळाप्रकरणी अपेक्षेप्रमाणे चंपत राय व अनिल मिश्रा यांचे राजीनामे झाले पण पुढे काय? हा प्रश्न अनुत्तरितच आहे. याप्रकरणी योगींनी एसआयटी स्थापन केली असली तरी एसआयटीचा अहवाल येण्यापूर्वीच राम मंदिरचे कोषाध्यक्ष गोविंदगिरी हे चंपत राय निर्दोष असल्याची प्रमाणपत्रे वाटत फिरत आहेत. चंपत राय दोषी नाहीत, मिश्रा दोषी नाहीत, मग दोषी आहे कोण? याप्रकरणी दिल्लीचा असणारा दबाव लक्षात घेता फार वेगाने कारवाई होईल, असे दिसत नाही. जो तो एकमेकाला वाचविण्याचा प्रयत्न करत आहे. पंतप्रधानांचे विश्वासू अधिकारी नृपेंद्र मिश्रा राम मंदिरात लक्ष घालायला लागल्यानंतर हे प्रकरण दिल्लीपर्यंत तरी गेले. मात्र मोदी-शहा यांचे चंपत राय यांच्याशी असलेले सुमधुर संबंध पाहता पुढे काय होईल, याबाबत साशंकता आहे. मंदिर दानपेटीच्या घोटाळ्याचा केंद्रबिंदू चंपत राय असले तरी अयोध्या परिसरात योगी आदित्यनाथ मुख्यमंत्री झाल्यापासून संघाच्या कार्यात महत्त्वाची भूमिका असलेले अनिल सिंग, शैलेंद्रसिंग व श्रीरामसिंह यांची भूमिकाही तितकीच संशयास्पद आहे. हे तिघेही ठाकूर योगींच्या निकटवर्तीय असून त्यांच्याबद्दल अनेक चर्चा ऐकायला मिळतात. एकंदरीतच राम मंदिर देणग्यांवर जमेल त्याने हवा तसा हात मारला आहे. चंपत राय आज गपगुमान आहेत. उद्या त्यांनी तोंड उघडले तर मोदी-शहा यांची कल्हई निघेल. त्यामुळे चंपत राय यांना एसआयटीतून ‘क्लीन चिट’ देऊन महान त्यागमूर्ती बनवले जाईल. पण जनतेच्या मनातून या चोर मंडळींना कधीही क्लीन चिट मिळणार नाही!

‘दुसऱ्या लग्ना’ची तिसरी गोष्ट

त्रिपुराचे माजी मुख्यमंत्री व विद्यमान खासदार बिप्लव देव सध्या चर्चेत आहेत. अर्थात हे महाशय कधीही चांगल्या कारणांसाठी चर्चेत नसतात. यावेळी ते चर्चेत खासगी जीवनामुळे आहेत. बिप्लव यांनी पन्नाशीत दुसऱ्यांदा लग्नगाठ बांधली आहे, तीही दक्षिणेकडची सिनेतारका त्रिवेणी राव यांच्याशी. या ग्लॅमरमुळे बिप्लव यांचे लग्न चर्चेत आले आहे. बिप्लव यांचा नीती देब या पहिल्या पत्नीशी रीतसर घटस्फोट झाला. नीती यांनी बिप्लव यांच्याबद्दल अनेक गंभीर तक्रारी अगदी पंतप्रधानांपासून ते सरसंघचालकांपर्यंत केल्या होत्या. मात्र, नारी शक्तीचा नारा देणाऱ्या सरकारकडून त्याची दखल घेतली गेली नाही. राजकारणात नशिबाचा फॅक्टर फार महत्त्वाचा असतो. बिप्लव देव हे कधीकाळी मध्य प्रदेशचे भाजपचे खासदार गणेशसिंग यांचे पीए होते. गणेशसिंग पाचव्यांदा खासदार बनले. मात्र बिप्लव यांचे नशीब इतके जोरात की ते थेट त्रिपुरात भाजपचे प्रदेशाध्यक्ष व नंतर मुख्यमंत्री बनले. मात्र, ‘दैव देते अन् कर्म नेते’ या न्यायाने त्यांनी त्रिपुरात कारभार केला. कोणतीही पात्रता नसताना एखादे मोठे जबाबदारीचे पद मिळाल्यावर माणूस ज्या बेताल पद्धतीने वागतो, त्याच पद्धतीने बिप्लव वागले. त्याची इतकी चर्चा भाजपच्या वर्तुळात झाली की, त्यांना तडकाफडकी मुख्यमंत्रीपदावरून हटवून माणिक साहा यांना तिथे बसवावे लागले. बिप्लव यांच्यासारखे सेवाभावी पक्षनेतृत्वाचे ‘लाडके’ होऊन सत्तेचा मलिदा ओरपत असतात. बिप्लव यांच्या खासगी जीवनाविषयी कोणालाही कसलाही आक्षेप असण्याचे कारण नाही. मात्र खासगी व सार्वजनिक जीवनाची सरमिसळ केली की त्याची चर्चा तर होणारच. बिप्लव यांच्या दुसऱ्या लग्नाची तिसरी गोष्ट सध्या भलतीच चर्चेत आहे.