
‘धुरंधर’ चित्रपटातील रहमान डकैत ही भूमिका आजही सर्वांच्याच लक्षात आहे. परंतु ही भूमिका करण्यासाठी अक्षय खन्नाने स्पष्टपणे नकार दिला होता. आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर’ चित्रपटातील अक्षय खन्नाच्या ‘रहमान डकैत’ या भूमिकेची चर्चा आजही सर्वत्र रंगते. परंतु ही भूमिका स्वीकारण्यापूर्वी अक्षय खन्नाने चक्क ती नाकारली होती. असे कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाब्रा यांनी एका मुलाखतीत सांगितले.
शेखर सुमन यांच्या शोमध्ये बोलताना मुकेश छाब्रा यांनी ‘धुरंधर’च्या कास्टिंगमागची कहाणी सांगितली. त्यांच्या म्हणण्यानुसार, अक्षय खन्ना या भूमिकेसाठी पहिली पसंती नव्हता. त्याआधी दोन-तीन बड्या कलाकारांनी ही भूमिका नाकारली होती. मुकेश छाब्रा यांनी सांगितले की, त्यांनी अक्षय खन्नाला भूमिकेची माहिती दिली तेव्हा त्याची पहिली प्रतिक्रिया नकारात्मक होती. छाब्रा म्हणाले, अक्षयला कथा सांगितली तेव्हा तो म्हणाला, ‘वेडा झाला आहेस का? मी व्हिलनची भूमिका का करू?’ मात्र, अक्षयने पुढील काही मिनिटे कथा ऐकली आणि त्याचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलला. “पाच मिनिटे कथा ऐकल्यानंतर ते म्हणाले, ‘फॅन्टॅस्टिक!’ आणि त्याच दिवशी त्यांनी होकार दिला,” असे छाब्रा यांनी सांगितले.
या भूमिकेसाठी अक्षयच्या आधी दोन-तीन मोठ्या स्टार्सशी संपर्क साधण्यात आला होता, अशी माहितीही छाब्रा यांनी दिली. त्यांच्या मते, काही कलाकारांना हा अनेक कलाकारांचा समावेश असलेला चित्रपट असल्याने भूमिका स्वीकारण्याबाबत संकोच होता. कलाकार अनेकदा व्यावसायिक गणितांचा विचार करतात, असे सांगताना छाब्रा यांनी म्हटले की, कलाकार जेव्हा हृदयापेक्षा केवळ डोक्याने निर्णय घेतात, तेव्हा अडचण निर्माण होऊ शकते.
‘धुरंधर’च्या प्रसिद्धीमध्ये अक्षय खन्नाच्या खलनायकी भूमिकेला मिळालेल्या महत्त्वाबद्दलही छाब्रा यांनी रणवीर सिंगचे कौतुक केले. “रणवीरला सलाम. त्याला चित्रपटाच्या उत्तरार्धात काय घडणार आहे, हे माहीत होते. त्याने या चित्रपटासाठी स्वतःला पूर्णपणे झोकून दिले,” असेही छाब्रा यावेळी म्हणाले.




























































