
शहरातील विकासकामे, प्रस्ताव आणि धोरणात्मक निर्णय यावर चर्चा होण्याऐवजी नवी मुंबई महापालिकेच्या महासभेत भाजप आणि शिंदे गट यांच्याकडून एकमेकांची उणीदुणी काढणे सुरू आहे. त्यामुळे ही महासभा आरोप आणि प्रत्यारोपांचा आखाडा बनली आहे. आपल्या प्रभागातील विकासकामांचे सुमारे एक हजार प्रस्ताव तदर्थ समितीत धूळखात पडून असल्याने सर्वच पक्षांच्या नगरसेवकांमध्ये धुसफूस सुरू झाली आहे. शिंदे गट आणि भाजपमधील वाद थेट खालच्या पातळीला येऊ लागल्याने त्याचा फटका आता पालिकेच्या अधिकाऱ्यांना बसू लागला आहे.
वाशीमधील एका इमारतीला चुकीच्या पद्धतीने ओसी दिल्याचा आरोप करून महापौर सुजाता पाटील यांनी सहाय्यक नगर रचना संचालक सोमनाथ केकाण यांना त्यांच्या मूळ विभागात पाठवण्याचा निर्णय घेतला होता. अग्निशमन अधिकारी पुरुषोत्तम जाधव यांनी केकाण यांच्यावर दबाव आणल्याचा आरोप केल्यानंतर महापौरांनी ही कारवाई केली होती. त्यानंतर या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीने केकाण यांना क्लीनचिट दिली आहे. त्यामुळे जाधव यांच्या अडचणी वाढल्या आहेत.
अतिरिक्त आयुक्त डॉ. राहुल गेठे यांनाही शासनाकडे परत पाठवण्याचा प्रस्ताव महासभेत मांडण्यात आला होता, मात्र तो स्थगित ठेवण्यात आला आहे. विधी अधिकारी अभय जाधव यांना निलंबित करण्याचा ठराव महासभेत मंजूर करण्यात आला आहे. मात्र प्रशासनाने अद्यापपर्यंत त्यांच्यावर कोणतीही कारवाई केलेली नाही. शिंदे गट आणि भाजपच्या वादात अधिकारी विनाकारण भरडले जात असल्याने प्रशासकीय वर्तुळात नाराजी पसरली आहे.
सचिव विभागाची दिरंगाई
महासभेत मंजूर झालेल्या विकासकामांच्या प्रस्तावाचे इतिवृत्त वेळेत पाठवले जात नाही. त्यामुळे विकासकामांची रखडपट्टी झाली आहे. अशाच पद्धतीने सचिव विभागाने दिरंगाई सुरू ठेवली तर वर्षभर एकही विकासकाम होणार नाही, अशी नाराजी माजी महापौर जे. डी. सुतार आणि शिवराम पाटील यांनी व्यक्त करून प्रशासनाला धारेवर धरले.
तदर्थ समितीच्या नावाने बोंबाबोंब
शहरातील विकासकामांचे प्रस्ताव प्रथम तदर्थ समितीकडे पाठवण्याचा पायंडा सभागृह नेते सागर नाईक यांनी सुरू केला आहे. या समितीकडे आतापर्यंत एक हजार ८३० प्रस्ताव पाठवण्यात आले आहेत. त्यापैकी एक हजार ९८ प्रस्ताव हे गेल्या अनेक महिन्यांपासून धूळखात पडले आहेत. त्यामुळे या समितीच्या नावाने सध्या बोंबाबोंब सुरू आहे.



























































