विकासकामे थांबवून दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी खर्च करा – रोहित पवार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी आज मराठवाडय़ातील दुष्काळी भागात शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली. दुष्काळी परिस्थिती गंभीर असून सरकारने शक्तिपीठ महामार्गसारखी विकासकामे तूर्त थांबवून तो निधी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना जगवण्यासाठी खर्च करावा, अशी मागणी त्यांनी केली.

रोहित पवार यांनी धाराशीव आणि बीड जिल्ह्यांतील पाहणीनंतर लातूर जिह्यातील किनगाव येथे आज शेताच्या बांधावर जाऊन दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधला. प्रशासनाकडून पंचनामे आणि मदत मिळत नसल्याबद्दल शेतकऱ्यांनी या वेळी तीव्र नाराजी व्यक्त केली. शेतकऱ्यांचे खरीप पीक 75 टक्क्यांहून अधिक उद्ध्वस्त झाले आहे आणि रब्बी हंगामातही पीक घेता येईल अशी आशा मावळली आहे. त्यामुळे उपासमारीचे संकट शेतकऱ्यांपुढे आहे. पुढील दहा महिने शेतकऱ्यांना जगवण्याचे आव्हान सरकारसमोर आहे असे रोहित पवार म्हणाले.

मराठवाडय़ातील शेतकरी एकीकडे उद्ध्वस्त झाला असताना दुसरीकडे जनावरांच्या चाऱ्यासह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. त्यामुळे सरकारने तत्काळ दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना मदत द्यावी, अशी मागणीही रोहित पवार यांनी केली. आज अजितदादा पवार असते तर नियम आणि अटींमध्ये अडकले नसते, ते जनतेसाठी काम करणारे नेतृत्व होते, महायुतीतील इतर नेत्यांना जनतेच्या प्रश्नांचे देणे-घेणे नाही, असे टीकास्त्रही त्यांनी सोडले.

z मराठवाडय़ामध्ये दुष्काळाची दाहकता भयावह आहे. उभा खरीप हंगाम उद्ध्वस्त झाला आहे. शेती पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांची मोठी निराशा झाली आहे. आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना आधाराची गरज आहे. शासनाने परिस्थितीचे गांभीर्य ओळखून तातडीने दुष्काळ जाहीर करावा.