
गणेशोत्सवात महाप्रसाद बनवण्याची लगबग सर्वत्र चालू आहे. मात्र यंदा बाप्पाचा महाप्रसाद बनवताना घरगुती गॅस सिलिंडरवर बंदी घालण्यात आली आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी फक्त व्यावसायिक सिलिंडरचाच वापर करावा, असे आदेश ठाण्याचे सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी योगेश जंगले यांनी जिल्ह्यातील सर्व तहसीलदारांमार्फत दिले आहेत. घरगुती सिलिंडरचा गैरवापर थांबावा तसेच आगीसारखी दुर्घटना घडू नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
ठाणे जिल्ह्यात असंख्य गणेशोत्सव मंडळे असून दरवर्षी महाप्रसादाचे आयोजन करण्यात येते. या प्रसादाचा स्वयंपाक तयार करताना अनेक जण घरगुती सिलिंडरचा वापर करायचे. पण घरगुती व व्यावसायिक क्षमतेत आणि त्याच्या बर्नर व गॅसच्या प्रेशरमध्ये मोठा फरक असतो. त्याशिवाय अन्न शिजवताना घरगुती सिलिंडरचा वापर केला तर स्फोटासारखी दुर्घटना घडायची भीती असते. एखादी दुर्घटना घडली तर बीमा कंपन्या संरक्षण नाकारतात. ही बाब लक्षात घेऊन यावर्षी घरगुती सिलिंडर वापरू नये, असे बजावण्यात आले आहे.
महापालिका, पोलीस प्रशासन आणि पुरवठा विभागामार्फत गणेश मंडळांना मंडप, ध्वनी किंवा महाप्रसादाची परवानगी देताना ‘केवळ व्यावसायिक सिलिंडर वापरणे बंधनकारक राहील’ ही अट परवानगी पत्रातच स्पष्ट नमूद केली आहे.
स्थानिक स्वराज्य संस्था आणि पोलिसांनी संयुक्त परिपत्रक काढून मंडळांना याबाबत पूर्वकल्पना द्यावी आणि तहसीलदारांनी आपल्या तालुक्यातील मंडळांना सूचित करून केलेल्या कार्यवाहीचा अहवाल तातडीने जिल्हा कार्यालयाकडे सादर करावा, असे स्पष्ट आदेश जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी दिले आहेत.
तर थेट फौजदारी गुन्हा
जीवनावश्यक वस्तू कायद्यानुसार सार्वजनिक कामांसाठी घरगुती गॅस सिलिंडर वापरणे हा गंभीर गुन्हा आहे. एखादा अपघात घडला तर संबंधित मंडळाच्या पदाधिकाऱ्यांवर थेट फौजदारी गुन्हादेखील दाखल होऊ शकतो. त्यामुळे सर्व मंडळांनी महाप्रसाद बनवताना घरगुतीऐवजी व्यावसायिक सिलिंडरच वापरावे, असे आदेश देण्यात आले आहेत.
हा आहे फरक
घरगुती आणि व्यावसायिक सिलिंडरची क्षमता व बर्नरच्या प्रेशरमध्ये मोठा फरक असल्याचे ग्राहक दक्षता कल्याण फाऊंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी म्हटले आहे. महाप्रसादाच्या मोठ्या भांड्यासाठी घरगुती सिलिंडर वापरणे धोकादायक ठरू शकते. त्यामुळे सर्व मंडळांनी व गणेशभक्तांनी योग्य ती काळजी घ्यावी, असे आवाहन पुरवठा विभागाने केली आहे.



























































