
गौरी-गणपतीचे विसर्जन झाल्यानंतर पुन्हा मुंबईच्या दिशेने निघालेल्या गणेशभक्तांवर आज कोंडीचे विघ्न निर्माण झाले. माणगाव आणि इंदापूरदरम्यान तब्बल आठ किलोमीटर लांबच लांब वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. त्यामुळे मुंबई-गोवा महामार्ग ठप्प झाला. पोलादपूर ते पळस्पे हे १५५ किलोमीटरचे अंतर कापण्यासाठी वाहनांना सुमारे सात ते आठ तासांचा कालावधी लागल्याने गणेशभक्तांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. कोकणात जातानाही वाहतूककोंडी आणि येतानाही वाहतूककोंडीचा सामना करावा लागल्याने गणेशभतांचा संताप अनावर झाला.
आज मुंबई-गोवा महामार्गावर वाहनांची संख्या लक्षणीय वाढली. या महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम अनेक ठिकाणी रखडले आहे. तसेच ठिकठिकाणी महामार्गावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. यामुळे आज कोकणातून परतणाऱ्या गणेशभक्तांना मोठ्या वाहतूककोंडीचा सामना करावा लागला. माणगाव आणि इंदापूर परिसरात तर वाहनांच्या मोठमोठ्या रांगा लागल्याने गणेशभक्तांची मोठी रखडपट्टी झाली.
काम कधी पूर्ण होणार
गणेशोत्सवाच्या काळात कोकणात लाखो चाकरमानी ये जा करतात, हे दरवर्षीचे वास्तव आहे. मात्र त्यानंतरही या मार्गावरील वाहतूककोंडी फोडण्यासाठी कोणताही ठोस उपाय केला जात नाही. महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम अनेक वर्षांपासून रखडले आहे. हे रखडलेले काम कधी पूर्ण होणार, असा सवाल कोकणवासीयांनी उपस्थित करून या महामार्गाच्या रखडपट्टीवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
पोलादपूर ते पळस्पे या अवघ्या १५५ किलोमीटरच्या अंतरासाठी नेहमी दोन ते अडीच तास लागतात. मात्र आज हे अंतर कापण्यासाठी वाहनांना तब्बल सात ते आठ तासांचा वेळ लागला. माणगाव, इंदापूर परिसरात मुंबईकडे येणाऱ्या मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. त्यामुळे कोकणवासीय याच ठिकाणी सुमारे दीड तास अडकून पडले होते.
मुंबई-गोवा महामार्गावर गणेशोत्सवात वाहतूककोंडी होऊ नये, यासाठी चांगले नियोजन करण्याचा दावा प्रशासनाने केला होता. मात्र हे नियोजन फक्त कागदावरच राहिल्याचे आता उघड झाले आहे.
प्रवाशांनी व्यक्त केला संताप
गणेशोत्सव सुरू होताना कोकणाकडे जाणाऱ्या मार्गावर वाहतूककोंडी झाली होती. उत्सव आटोपल्यानंतर परतीच्या प्रवासातही परिस्थितीत फारसा फरक पडला नाही. ‘गावी जाताना कोंडी, बाप्पाला निरोप देऊन परततानाही कोंडी’ अशी संतप्त प्रतिक्रिया प्रवाशांमधून उमटत होती. वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलीस अधिकारी आणि कर्मचारी रस्त्यावर उतरून प्रयत्न करत होते. मात्र वाढलेली वाहनांची संख्या, रखडलेली कामे आणि खड्ड्यांमुळे निर्माण होणारा वाहतुकीचा अडथळा यामुळे पोलिसांच्या प्रयत्नांनाही मर्यादा येत होत्या.



























































