हिंदुस्थानचा टी-20 चा मुकुट इंग्लंडने हिसकावला; जागतिक क्रमवारीत इंग्लंड पुन्हा नंबर वन, पण त्यांच्या स्थानाला धोका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

टी20 क्रिकेटमध्ये अव्वल स्थानावर विराजमान असलेल्या हिंदुस्थानला अचानक मोठा धक्का बसला आहे. श्रीलंकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी20 मालिकेत इंग्लंडने 3-0 असे निर्भेळ यश संपादत आयसीसी टी-20 क्रमवारीत हिंदुस्थानला मागे टाकत पुन्हा नंबर वनचा ताज मिळवला. विशेष म्हणजे दोन्ही संघांच्या खात्यात 269 रेटिंग गुण आहेत. मात्र क्रमवारीतील अचूक दशांश गणनेत इंग्लंडचा आकडा हिंदुस्थानपेक्षा किंचित सरस ठरल्याने इंग्लंड पहिल्या, तर हिंदुस्थान दुसऱ्या स्थानावर घसरला आहे.

इंग्लंडने श्रीलंकेविरुद्धची मालिका केवळ जिंकली नाही, तर तीनही सामने एकतर्फी पद्धतीने खिशात घातले. पहिल्या टी20 सामन्यात इंग्लंडने तब्बल 119 धावांनी विजय मिळवला. दुसऱ्या सामन्यात सहा विकेटने बाजी मारल्यानंतर तिसऱ्या सामन्यातही श्रीलंकेला कोणतीही संधी दिली नाही. मँचेस्टरच्या ओल्ड ट्रफर्डवर श्रीलंकेचा डाव 124 धावांत गुंडाळल्यानंतर इंग्लंडने हे लक्ष्य केवळ 9.4 षटकांत दोन विकेटच्या मोबदल्यात पार केले

इंग्लंडच्या या वादळी विजयाचा केंद्रबिंदू ठरला जोस बटलर. त्याने अवघ्या 32 चेंडूंत नाबाद 62 धावा ठोकत श्रीलंकेच्या गोलंदाजीची अक्षरशः धुलाई केली. कर्णधार हॅरी ब्रूकने 33 धावांची खेळी केली. बटलरच्या फटकेबाजीमुळे इंग्लंडने लक्ष्य गाठताना तब्बल 62 चेंडू शिल्लक ठेवले. या विजयासह श्रीलंकेविरुद्ध इंग्लंडची सलग टी20 विजयांची संख्या 15वर पोहोचली.

इंग्लंडसाठी हा नंबर वनचा मुकुट मात्र नवीन नाही. याच वर्षी हिंदुस्थानविरुद्धच्या टी20 मालिकेत 4-0 विजय मिळवल्यानंतरही इंग्लंड अव्वल स्थानावर पोहोचला होता. त्यानंतर हिंदुस्थानने झिम्बाब्वे आणि अफगाणिस्तानविरुद्ध मालिका जिंकत पुन्हा नंबर वन स्थान मिळवले. आता श्रीलंकेविरुद्धच्या 3-0 विजयाने इंग्लंडने पुन्हा तख्तावर झेप घेतली आहे. मात्र हिंदुस्थानची स्थितीही लक्षवेधी आहे. 269 रेटिंग गुणांसह हिंदुस्थान दुसऱ्या स्थानावर असला तरी त्याला पुन्हा हे स्थान काबीज करायला फार वेळ लागणार नाही.