इंजिनीअरिंग-फार्मसी प्रवेशासाठी बारावीचे गुण ग्राह्य धरणार, उच्च व तंत्रशिक्षण विभागाद्वारे तज्ञ समिती स्थापन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अभियांत्रिकी आणि औषधनिर्माणशास्त्र पदवी प्रवेशासाठी बारावी बोर्डाच्या परीक्षेतील गुण ग्राह्य धरले जाणार आहेत. व्यावसायिक अभ्यासक्रमांचे प्रवेश केवळ ‘एमएचटी-सीईटी’ च्या गुणांवर न होता बारावी बोर्डाच्या गुणांनाही समान प्राधान्य दिले जाणार आहे. राज्यातील अभियांत्रिकी आणि औषधनिर्माणशास्त्र पदवी प्रवेश प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे. नवे धोरण निश्चित करण्यासाठी राज्याच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाने 17 सप्टेंबरला अध्यादेश काढत तज्ञ समिती स्थापन केली.

यंदा बारावीत काठावर पास झालेल्या किंवा कमी गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांनी सीईटीत थेट 99 पर्सेटाइल मिळवल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले होते. त्यामुळे सीईटीच्या कार्यपद्धतीबद्दल आणि संपूर्ण परीक्षा पद्धती तसेच गोपनीयतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. या प्रकरणामुळे शैक्षणिक क्षेत्राबद्दल शंका व्यक्त करण्यात येत होत्या. पालकांच्या वाढत्या दबावानंतर प्रशासनाने इंजिनीअरिंग-फार्मसी प्रवेशासाठी बारावीचे गुण ग्राह्य धरण्याचा निर्णय घेतला आहे.

तज्ञ समिती काय करणार ?

अभियांत्रिकी आणि औषधनिर्माणशास्त्र पदवी व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी ‘एमएचटी-सीईटी’ पर्सेंटाईल आणि बारावी परीक्षेतील गुणांची टक्केवारी विचार करून गुणवत्ता यादी निश्चित करण्याचे धोरण ही समिती ठरविणार आहे.

मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू समितीचे अध्यक्षस्थान भूषवतील. या समितीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ (लोणेरे), सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू आणि उच्च शिक्षण संचालक सदस्य असतील. तंत्रशिक्षण संचालनालयाचे संचालक सदस्य सचिव असतील. समितीला 15 दिवसांत अहवाल सादर करायचा आहे.