
रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेला संघर्ष आता अधिक तीव्र होताना दिसत आहे. युक्रेनने रशियाची राजधानी मॉस्को आणि आसपासच्या भागावर आतापर्यंतचा सर्वात मोठा ड्रोन हल्ला चढवला आहे. युक्रेनने रशियावर 1000 हून अधिक ड्रोन डागले आहेत. या हल्ल्यात एका महिलेसह दोघांचा मृत्यू झाला असून एका प्रमुख तेल शुद्धीकरण कारखान्याचेही मोठे नुकसान झाले आहे.
रशियात तीन दिवसांच्या संसदीय निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. या निवडणुकीच्या शेवटच्या दिवशी युक्रेनने रशियावर हल्ला चढवला. रशियन हवाई दलाने आणि संरक्षण प्रणालीने युक्रेनचे तब्बल 1600 हून अधिक ड्रोन हवेतच नष्ट केले. यातील तब्बल 450 ड्रोन थेट मॉस्को शहराच्या दिशेने येत होते, अशी माहिती मॉस्कोचे महापौर सेर्गेई सोबयानिन यांनी दिली. निवडणुकीत अडथळा आणण्यासाठीच युक्रेनने हा योजनाबद्ध आणि अभूतपूर्व हल्ला घडवून आणल्याचा आरोप प्रशासनाने केला आहे.
News Alert ! Ukraine fires more than 1,000 drones at Russia including largest ever attack on Moscow, reports AP quoting Russian officials. pic.twitter.com/PfN63l8u4T
— Press Trust of India (@PTI_News) September 20, 2026
युक्रेनने केलेल्या या हल्ल्यात एका 44 वर्षीय महिलेचा आणि एका वृद्ध पुरुषाचा वेगवेगळ्या ठिकाणी मृत्यू झाला. एका 21 मजली निवासी इमारतीवर ड्रोन कोसळल्याने भीषण आग लागली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन आपत्कालीन पथकांनी तातडीने 400 हून अधिक रहिवाशांना सुरक्षित स्थळी हलवले, अशी माहिती मॉस्कोचे प्रांतीय राज्यपाल अँड्रे वोरोब्योव्ह यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत दिली.
युक्रेनने गेल्या काही महिन्यांपासून रशियाच्या ऊर्जा आणि आर्थिक पायाभूत सुविधांवर लांब पल्ल्याच्या ड्रोनद्वारे हल्ले तीव्र केले आहेत. या कारवाईचा मुख्य उद्देश रशियाच्या युद्धनिधीचा मुख्य स्रोत असलेले इंधन उत्पादन ठप्प करणे हा आहे. ताज्या हल्ल्यात मॉस्को ऑइल रिफायनरीच्या आवारात एका ड्रोनमुळे मोठे नुकसान झाले असून अग्निशामक दल आणि आपत्कालीन यंत्रणा घटनास्थळी कार्यरत आहेत. सुदैवाने या कारखान्यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. यापूर्वीही या कारखान्याला युक्रेनियन हल्ल्यांचा फटका बसला आहे, असे महापौर सोबयानिन यांनी सांगितले.
100 टक्के टॅरिफ विधेयकावर ट्रम्प यांची स्वाक्षरी, हिंदुस्थानच्या अडचणी वाढणार
दरम्यान, रशिया आणि युक्रेन या दोन्ही देशांनी एकमेकांच्या ऊर्जा प्रकल्पांवर हल्ले न करण्याबाबत सहमती दर्शवली आहे, असा दावा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला होता. मात्र, ट्रम्प यांच्या या दाव्यानंतर अवघ्या काही दिवसांतच युक्रेनने रशियाच्या मुख्य तेल शुद्धीकरण कारखान्याला लक्ष्य केल्याने आंतरराष्ट्रीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.




























































