पत्नीसह तीन चिमुकल्यांची झोपेतच वार करून निर्घृण हत्या; रक्ताळलेली कुऱ्हाड घेऊन उंबरठ्यावर बसलेल्या 28 वर्षीय पतीला अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कौटुंबिक वादातून पतीने झोपेतच पत्नीसह तीन चिमुकल्यांची कुऱ्हाडीने वार करून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मध्य प्रदेशातील दमोह जिल्ह्यातील हट्टा तहसीलमधील कबीरपूर गावात शुक्रवारी पहाटे ही घटना घडली. या हत्याकांडामुळे संपूर्ण परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. घटनेनंतर रक्ताने माखलेली कुऱ्हाड हातात घेऊन घराच्या उंबरठ्यावर बसलेल्या 28 वर्षीय आरोपी पतीला पोलिसांनी तात्काळ अटक केली आहे.

द्वारका पटेल (वय – 28) असे अटक करण्यात आलेल्या आरोपी पतीचे नाव आहे. या घटनेत त्याची पत्नी खेमा पटेल, सात वर्षांची मोठी मुलगी आणि अनुक्रमे चार व एक वर्षाचे दोन लहान मुलगे अशा चार जणांचा जागीच मृत्यू झाला.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, द्वारका आणि त्याची पत्नी खेमा यांच्यात गेल्या वर्षभरापासून वाद सुरू होता. सुमारे सहा महिन्यांपूर्वी पत्नीने पतीविरोधात छळाची तक्रारही दाखल केली होती. गेल्या दोन दिवसांत त्यांच्यातील वाद अधिक चिघळला होता. यानंतर खेमाच्या माहेरच्या लोकांनी मध्यस्थी करून दोघांमधील वाद मिटवण्याचा प्रयत्न केला होता. सर्व काही सुरळीत झाले आहे असे समजून नातेवाईक आपापल्या घरी निघून गेले. मात्र, शुक्रवारी पहाटे साडेचार वाजेच्या सुमारास पत्नी आणि तिन्ही मुले गाढ झोपेत असताना आरोपी द्वारका याने घरातील कुऱ्हाडीने सर्वांवर एकामागून एक वार केले. या हल्ल्यात चौघांचाही जागीच मृत्यू झाला.

दरम्यान, पहाटेच्या सुमारास घडलेल्या या प्रकारानंतर गावकऱ्यांनी सकाळी 6 वाजताच्या सुमारास आपत्कालीन क्रमांकावर पोलिसांशी संपर्क साधला. माहिती मिळताच मगरॉन पोलीस ठाण्याचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलीस पोहोचले तेव्हा आरोपी हातात रक्ताने माखलेली कुऱ्हाड घेऊन घराच्या मुख्य दारातच बसलेला दिसून आला. पोलिसांनी त्याला तात्काळ ताब्यात घेतले.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन दमोहचे पोलीस अधीक्षक आनंद कलाडगी यांनी पोलीस पथकासह घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. याप्रकरणी फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळावरून आवश्यक पुरावे गोळा केले आहेत. कौटुंबिक कलहातूनच हे हत्याकांड घडल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले असून, आरोपीची सध्या कसून चौकशी सुरू आहे. या घटनेमुळे कबीरपूर गावावर प्रचंड शोककळा पसरली आहे.