
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांची बहीण अलिमा खानम यांना आज लाहोर येथून त्यांच्या निवासस्थानातून अटक करण्यात आली. इम्रान खान यांच्या सुटकेच्या मागणीसाठी 27 सप्टेंबरला इस्लामाबादमध्ये आंदोलन करण्यात येणार आहे. त्यापूर्वीच ही कारवाई केली आहे.
इम्रान खान हे अडियाला तुरुंगात शिक्षा भोगत आहेत. शनिवारी त्यांची सविस्तर वैद्यकीय तपासणी करण्यात आली होती. त्यानंतर आज अचानक पोलिसांनी अलिमा यांना अटक केली. या कारवाईमुळे पाकिस्तानात खळबळ उडाली आहे. इम्रान खान यांचा ‘पीटीआय’ पक्ष 27 सप्टेंबरला मोठा मोर्चा काढणार असून त्याची तयारी सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आल्याचे बोलले जात आहे. अलिमा यांना अटक केल्यानंतर कोट लखपत तुरुंगात पाठविण्यात आले आहे. इम्रान खान यांची बहीण नोरीन नियाझी यांनी या कारवाईचा तीव्र निषेध केला आहे. पाकिस्तान सरकार एवढे घाबरले आहे की, ते एका महिलेला अटक करत आहेत, असे त्या म्हणाल्या.
इम्रान खान यांच्या प्रकृतीवरून अलीमा यांनी सातत्याने आवाज उठवला होता. इम्रान यांना नातेवाईकांना भेटू दिले जात नव्हते. त्यामुळे त्यांच्या बहिणी नोरीन, उजमा आणि अलिमा यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर ऑगस्ट महिन्यात त्यांची अडियाला तुरुंगात भेट घेतली होती.
अनेक कार्यकर्त्यांनाही अटक
अलिमा यांच्याशिवाय पीटीआय पक्षाच्या अनेक कार्यकर्त्यांनादेखील अटक करण्यात आली आहे. 27 सप्टेंबर रोजी होणाऱया मोर्चाशी संबंधित बैठकीनंतर ही कारवाई करण्यात आली. पक्षाचे अध्यक्ष गोहर अली खान यांनी 27 तारखेचा मोर्चा शांतीपूर्ण राहणार असल्याचे यापूर्वीच जाहीर केले होते.






























































