
आम आदमी पक्षाचे संयोजक आणि दिल्लीचे तीन वेळा मुख्यमंत्री राहिलेले अरविंद केजरीवाल यांचे नाव मतदार यादीत किंवा निवडणूक प्रक्रियेत मॅप न झाल्याच्या मुद्द्यावरून आपने निवडणूक आयोगावर जोरदार निशाणा साधला आहे. आपचे नेते सौरभ भारद्वाज यांनी निवडणूक आयोगाच्या कार्यप्रणालीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, इतक्या मोठ्या नेत्याचे नाव आयोगाकडून कसे काय सुटू शकते, असा सवाल केला आहे.
सौरभ भारद्वाज यांनी निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर संशय व्यक्त करताना म्हटले आहे की, सध्याचे मुख्यमंत्री आणि इतर मंत्र्यांनी आपले पत्ते बदलले असतानाही निवडणूक आयोगाने त्यांच्या पत्त्यांची यशस्वीरीत्या मॅपिंग केली. मग दिल्लीसारख्या राज्याचे सलग तीन वेळा मुख्यमंत्री राहिलेल्या अरविंद केजरीवाल यांचे नाव मॅप करण्यात आयोग कसे काय अपयशी ठरू शकते? आयोगाचा हा भोंगळ कारभार अनेक शंकांना वाव देणारा असून, जाणीवपूर्वक केजरीवालांना लक्ष केले जात असल्याचा आरोप आपकडून करण्यात येत आहे.
दरम्यान, अरविंद केजरीवाल यांच्या कुटुंबीयांना अलीकडेच एसआयआर अंतर्गत मिळालेल्या नोटिशीमुळे दिल्लीतील राजकारण आधीच तापले आहे. भाजपकडून हेतुपुरस्सर त्रास दिला जात असल्याचा आरोप आपने केला आहे.





























































