
>> दुर्गेश आखाडे
वाटद एमआयडीसी विरोधी संघर्ष कृती समिती गेली दोन वर्षे वाटद परिसरातील प्रस्तावित संरक्षण प्रकल्पाला विरोध करत लढा देत आहे. आज रत्नागिरीतील शासकीय विश्रामगृहात उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यासोबत वाटद एमआयडीसी विरोधी संघर्ष कृती समितीची बैठक पार पडली. यावेळी संघर्ष समितीचे प्रमुख प्रथमेश गावणकर, संतोष बारगुडे, सहदेव वीर आणि अधिकारी वर्ग उपस्थित होता.याबैठकीत वाटद एमआयडीसी विरोधी संघर्ष कृती समितीने आपल्या भूमिका स्पष्टपणे मांडताना संरक्षण प्रकल्प रद्द करण्याची मागणी केली. संरक्षण प्रकल्पात मोठ्या प्रमाणात भूसंपादन होणार असल्याने स्थानिकांचा आंबा-काजू बागायती आणि मासेमारी व्यवसाय संपुष्टात येईल. त्याचबरोबर पर्यटन व्यवसाय धोक्यात येणार आहे.एमआयडीसीच्या नोटीसला कायदेशीररित्या उत्तर देत विरोध नोंदवला आहे. त्यामुळे विरोधाचा विचार करून संरक्षण प्रकल्प रद्द करावा अशी मागणी करण्यात आली. त्यानंतर पत्रकार परिषदेत प्रथमेश गावणकर यांनी आपली भूमिका मांडली. ते म्हणाले की, संरक्षण प्रकल्पांची अधिसूचना जाहीर करताना स्थानिकांची भूमिका विचारात घेतली नाही. वाटद परिसरात आम्हाला संरक्षण प्रकल्प का नको याची कारणे आम्ही प्रशासनासमोर मांडली. दरम्यानच्या काळात आम्ही ॲड. असीम सरोदे यांचे मार्गदर्शन घेतले. वाटद परिसरातील संरक्षण प्रकल्पाबाबत पुनर्विचार होऊन तो रद्द व्हावा. वाटद एमआयडीसीची आपण अधिसूचना काढली आहे त्यामध्ये जे वर्षानुवर्षे लोक रहात आहेत. त्यांचे प्रश्न सोडवले पाहिजेत. कुळवहिवाटखाली ज्यांचे दावे आहेत त्याकडे लक्ष दिले पाहिजे. भविष्यात कोणताही प्रकल्प येण्यापूर्वी तहसीलदार, प्रांताधिकारी आणि अन्य अधिकारी वर्गाने ग्रामस्थांशी संवाद साधून प्रकल्पाची माहिती घ्यावी. थेट प्रकल्प लादू नये.पर्यावरणपूरक प्रकल्प असेल. फळप्रक्रिया उद्योग, ऑटोमोबाइल्स आणि आयटी क्षेत्रातील उद्योग असेल तर, आम्ही पुढे येऊन त्यांचे स्वागत करू, असे गावणकर यांनी सांगितले.





























































