
>> विनायक
काही दिवसांपूर्वीच मराठीच्या शतायुषी व्याकरणतज्ञ प्रा. यास्मिन शेख या जग सोडून गेल्या. मुंबईच्या एसआयएस कॉलेजमध्ये केव्हातरी त्यांची भेट व्हायची. सतत हसतमुख आणि प्रसन्न असं हे व्यक्तिमत्त्व. अखेरपर्यंत कार्य करण्याची त्यांची ऊर्जा प्रेरणादायी. खरोखर शतायुषी होऊन असं कृतार्थ जीवन लाभणं हा एक विलक्षण योगायोग. उद्या 22 सप्टेंबरला जागतिक शतायुषी दिवस. त्यानिमित्ताने आपल्याकडच्या अनेक शतायुषींच स्मरण झालं. त्यातील काही प्रसिद्ध व्यक्तींना पाहण्याचा, भेटण्याचाही योग आला.
आठवतं ते असं की, 1960 मध्ये केव्हातरी पुण्याची मावशी आम्हा काही मुलांना घेऊन हिंगण्याच्या महर्षी कर्वे यांच्या आश्रमात गेली होती. त्या वेळी महर्षी 102 वर्षांचे होते. त्यांना एकूण 105 वर्षांचं आयुष्य लाभलं. शतायुषी होताना ते म्हणाले होते, ‘हातून काही चांगले कार्य घडण्याची शक्यता असेल तर पुढेही जगणे आवडेल.’ ही निष्ठा त्यांच्या सत्कार्यावरची आणि एकूणच जीवनाविषयीचा ‘सुखेदुःखे समे कृत्वा’ असा भावनेने जीवनात रस घेऊनही अलिप्त राहण्याचा ‘योग’ त्यांना साधला होता.
शतायुषी गोंधळ महर्षींची भेट झाली तेव्हा तर अचंबित झालो. त्या वयातही पायी मोठे चाळ बांधून आणि ताठ उभे राहून ते दमदार ‘गोंधळ’ सादर करत. त्यांची मुलाखत घेता आली याचा आनंद वाटतो. असेच एक शतायुषी म्हणजे दादरचे खारकर आजोबा. त्यांनी तर ‘तीन शतकं’ पाहिली. एकोणीसाव्या शतकाच्या अखेरीस जन्मलेल्या खारकर आजोबांना एकवीसावं शतक पाहण्याचंही भाग्य लाभलं. असा योग केवळ दुर्मिळ.
शतायुषी गायक-नायक म्हणजे गणपतराव मोहिते तथा ‘पायाची दासी’ चित्रपटाचे नायक ‘मास्टर अविनाश.’ शंभराव्या वर्षी त्यांची स्मरणशक्ती उत्तम होती. मुलाखत चित्रित होत असताना त्यांनी अनेक नाटय़पदं आलापीसह गायिली आणि आम्ही थक्क झालो. लतादीदी त्यांना गणूमामा म्हणायच्या. दीदींचे वडील मास्टर दीनानाथ यांच्याबरोबर मोहिते यांनी नाटकात ‘स्त्र्ााr-पार्ट’ही केले होते. पुढे आचार्य अत्रे दिग्दर्शित ‘पायाची दासी’ चित्रपटासाठी त्यांना ‘मास्टर अविनाश’ हे नाव मिळालं. शंभर वर्षे पूर्ण व्हायला अवघे काही दिवस उरले असताना त्यांचा उत्साह अमाप होता. स्मरणरंजनात ते रंगून गेले होते.
शतायुषी झालेले आणि आजही कार्यरत असलेले प्रसिद्ध चित्रकार शि. द. फडणीस यांचीही मुलाखत चित्रित करण्याची संधी मिळाली. त्यांना पुन्हा भेटायची इच्छा आहे. अशा कृतार्थ आणि संपन्न जीवन व्यतीत केलेल्या व्यक्तींचा आशीर्वादही लाख मोलाचा असतो.
शतायुषींचा दिवस 22 सप्टेंबर, तर ज्येष्ठांचा जागतिक दिवस असतो 1 ऑक्टोबरला. आजच्या आठ अब्ज माणसांच्या जगात ज्येष्ठ मंडळी म्हणजे 70 ते 90 वयोगटातली त्यांची संख्या मोठी आहे. आपल्या 144 कोटी लोकांच्या देशात शतायुषी लोकांची संख्या निश्चितच काही हजारांत असेल. संपूर्ण जगात सुमारे 6 लाख 72 हजार शतायुषी मंडळी राहतात. त्यांचं अस्तित्व हाच समाजाचा मोठा आधार आहे.
आयुष्यातील असंख्य अकल्पित अशा अडीअडचणींचा सामना करत 100 वर्षांचं जीवन प्राप्त करणं ही साधी, सोपी गोष्ट नव्हे. ज्यांना तेवढं आयुष्य लाभलं ते त्यांना सहज वाटलं असेल, पण तन-मनाने ठणठणीत राहणं हा कष्टसाध्य जीवनयोगच म्हणावा लागेल.
जपान त्याबाबतीत अग्रेसर आहे. तिथे सुमारे 12 लाख शतायुषी माणसं आहेत. अमेरिकेत ही संख्या 64 ते 73 हजार भरते. चीनमध्ये 40 ते 48 हजारादरम्यान शतायुषी माणसं राहतात. फ्रान्समध्ये 30 हजार, तर सर्वाधिक लोकसंख्येच्या हिंदुस्थानात 30 ते 37 हजार शतायुषी असल्याचं म्हटलं जातं. जपानमध्ये दर एक लाखात 80 शतायुषी असतात. त्यापैकी बहुतेक अत्यंत ‘ऑक्टिव्ह’ किंवा कार्यरत असून सुखाचं जीवन जगतात.
शतायुषी होण्यामागे अनेक कारणं आहेत. एकतर आंतरिक जीवनेच्छा. आपण करत असलेल्या कार्यावरचं प्रेम आणि आत्मविश्वास. नेमस्त, प्रकृती सांभाळून केला जाणारा आहार-विहार, मानसिक सक्षमता आणि उपजत नैसर्गिक जीवन उर्मी. यामध्ये शरीरातील प्रभावशाली ‘सेल्युलर मेटॅबोलिझम’पासून (चयापचय क्रिया) ते त्या व्यक्तीचं सामाजिक, काwटुंबिक नातं किती घट्ट आहे, अशा सर्व गोष्टींचा अंतर्भाव असतो.
आपल्याकडे वाढदिवसाला ‘जीवेत् शरदः शतम्’ अशी शुभेच्छा देतात. याचा अर्थ जीवनात तुम्हाला शंभर शरद ऋतू प्राप्त होवोत असा होतो. शरद ऋतूला जीवनाच्या प्रसन्नतेत फार महत्त्व. एरवीही चांदणं पडतंच, पण ‘शरदाचे चांदणे’ महत्त्वाचे. आयुष्यातला वसंत फुलवायला शरद ऋतूची ऊर्जा हवी.
शतायुषींच्या जागतिक दिवसानिमित्त या सर्व ज्येष्ठांना अभिवादन करू या. सद्विचार आणि सत्कार्यासाठी त्यांचे आशीर्वाद मागू या. तन-मनाने निरोगी राहण्याचा प्रयत्न करू या. कारण आपल्यापैकीही काही उद्या शतायुषी होतील. त्यांना ‘शतायुषी भव’ अशी सदिच्छाही देऊ या.
































































