आज हिंदुस्थानकडून पदकांचा धमाका, नेमबाजांचा सुवर्ण पदकांवर निशाणा; हॉकी-कबड्डी-बॅडमिंटनचा रणसंग्राम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आशियाई क्रीडा स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी हिंदुस्थानच्या पदक मोहिमेला जबरदस्त वेग मिळणार आहे. 21 सप्टेंबरचा दिवस तब्बल 11 क्रीडा प्रकारांतील आव्हानांनी गाजणार असून, नेमबाजीपासून एमएमएपर्यंत अनेक ठिकाणी तिरंग्याला पदकाची संधी आहे. त्यामुळे सोमवारी पदकांचा मोठा धमाका होण्याची शक्यता आहे.

नेमबाजीत हिमांशू धिल्लन, पार्थ माने आणि रुद्रांक्ष पाटील 10 मीटर एअर रायफलमध्ये मैदानात उतरतील. स्कीटमध्येही हिंदुस्थानचे जबरदस्त आव्हान असेल. पहिल्याच दिवशी दोन रौप्यपदके मिळाल्यानंतर नेमबाजीच्या रेंजवर आणखी पदकांची अपेक्षा आहे.

एमएमएमध्ये सुचिका तारियाल 60 किलोच्या उपांत्य फेरीत सिंगापूरच्या तेओ हुई हूनविरुद्ध भिडणार आहे. उपांत्य फेरी गाठून तिने पदक निश्चित केले असून आता तिची नजर थेट अंतिम फेरीवर आहे. यात ती सोनेरी कामगिरीही करू शकते.

हॉकीमध्ये महिला संघाचा सामना इंडोनेशियाशी, पुरुष कबड्डी संघाचा जपानशी, तर महिला संघाचा बांगलादेशशी सामना होईल. बॅडमिंटनमध्ये पुरुष संघ बांगलादेशविरुद्ध मोहीम सुरू करेल. टेबल टेनिसमध्ये महिला आणि पुरुष संघ पाकिस्तानविरुद्ध भिडतील. जलतरणात ऋषभ दास 50 मीटर बॅकस्ट्रोकमध्ये पुन्हा आपला वेग दाखवेल.