
काँग्रेसच्या ‘छात्रों की गूंज’ कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मिमिक्री करणारा स्टँडअप कॉमेडियन पुलकित मनी याचा नोएडा येथे होणारा शो रद्द झाला आहे. पुलकित मनी याने स्वतः सोशल मीडियात पोस्ट करून ही माहिती दिली आहे.
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा ‘छात्रों की गूंज’ हा कार्यक्रम शनिवारी इंदूरमध्ये पार पडला. पुलकित मनी हा या कार्यक्रमात सहभागी झाला होता. राहुल गांधी हे मोदींच्या परराष्ट्र धोरणावर टीका करताना पुलकितने मोदींची मिमिक्री करत त्यांची खिल्ली उडवली. मोदी परदेशातील नेत्यांना कसे भेटतात, त्यांच्याशी हस्तांदोलन कसे करतात, त्यांच्याबरोबर असताना कसे हसतात याचे प्रात्यक्षिक त्याने दाखवले. पुलकितच्या या मिमिक्रीला विद्यार्थ्यांचा तुफान प्रतिसाद मिळाला.
आता अंडरग्राऊंड होण्याची वेळ आलीय!
या कार्यक्रमावरून भाजपच्या नेत्यांनी राहुल गांधी यांना लक्ष्य केले आहे. भाजपचे देशभरातील नेते राहुल यांच्यावर टीका करत आहेत, तर पुलकित याने त्याचा पुढचा शो रद्द केला आहे. शो रद्द करण्यामागचे कारण त्याने स्पष्ट केलेले नाही. मात्र, शो रद्द झाल्याची माहिती देताना त्याने केलेले ट्विट चर्चेचा विषय ठरले आहे. ‘आता अंडरग्राऊंड होण्याची वेळ आली आहे…’ असे त्याने म्हटले आहे. त्यामुळे तर्कवितका&ंना उधाण आले आहे.




























































