क्या हुआ तेरा वादा? अन्नधान्याच्या वाढत्या किंमतींवरून काँग्रेसने पंतप्रधान मोदींना केले लक्ष्य

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अन्नधान्याच्या किमती गगनला भिडलेल्या आहेत. यावरून काँग्रेसने सोमवारी मोदी सरकारवर हल्लाबोल केला. यावेळी त्यांनी १९७७ मधील गाजलेल्या ‘क्या हुआ तेरा वादा’ या बॉलिवूड गाण्याचा संदर्भ देत महागाईबाबतच्या पंतप्रधान मोदींच्या मौनावरून प्रश्न उपस्थित केले.

काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी एक बातमी शेअर केली, ज्यामध्ये असा दावा करण्यात आला आहे की, विविध अन्नपदार्थ, तसेच डाळी आणि खाद्यतेलाच्या किंमतीत झालेल्या वाढीमुळे सर्वसामान्य कुटुंबांचे बजेट पूर्णपणे कोलमडले आहे.

हिंदीतील आपल्या पोस्टमध्ये रमेश म्हणतात की, ‘देशात अन्नपदार्थांच्या गगनला पोहोचल्या आहेत. यामुळे मध्यम आणि गरीब वर्गाचे कंबरडे मोडले आहे’.

दैनंदिन वापराच्या जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती आसमानला भिडत असून, त्यामुळे सामान्यांचे जगणे असह्य झाले आहे, असा दावा त्यांनी केला.

‘गेल्या महिन्यात मसाल्यांच्या किंमती १० टक्क्यांनी ते २५ टक्क्यांनी वाढल्या आहेत. हिरवी वेलची ४००० रुपयांवरून ४४०० रुपये प्रति किलो झाली आहे, काळी वेलची २४०० रुपयांवरून २८०० रुपये प्रति किलो झाली आहे आणि जिरे ३६० रुपयांवरून ४०० रुपये प्रति किलोवर पोहोचले आहे. जायफळच्या किंमती थेट २५०० रुपयांवरून ३००० रुपये प्रति किलोवर पोहोचल्या आहेत.

‘तूर डाळ १०० रुपयांवरून १३० रुपये प्रति किलो, चणा डाळ ७० रुपयांवरून १०० रुपये प्रति किलो आणि उडीद डाळ १२० रुपयांवरून १४० रुपये प्रति किलो झाली आहे. मोहरीचे तेल १९० रुपयांवरून २१० रुपये प्रति लिटर झाले आहे आणि सफोला तेल २४० रुपयांवरून २८० रुपये प्रति लिटरवर पोहोचले आहे’, असे रमेश म्हणाले.

जून ते सप्टेंबर दरम्यान, संपूर्ण देशातील कांद्याची सरासरी किरकोळ किंमत २९.५० रुपये प्रति किलोवरून ५३.७८ रुपये प्रति किलोवर गेली आहे – अवघ्या साडेतीन महिन्यांत त्यात ८२.३ टक्क्यांची प्रचंड वाढ झाली आहे, असे ते म्हणाले.

वाढत्या महागाईमुळे गरिबांच्या ताटातून डाळी आणि जीवनावश्यक अन्नपदार्थ दुर्मिळ होत चालले आहेत, असे रमेश यांनी सांगितले.

‘परंतु पंतप्रधान महागाईवर मूग गिळून गप्प बसले आहेत. देश विचारत आहे, ‘पंतप्रधान जी, ते अच्छे दिन कुठे गेले?’ ते फक्त भाषणांमध्येच उरले आहेत का?’, असा सवाल त्यांनी केला.

जनता उपाशी मरतेय आणि सरकार मात्र गप्प बसले आहे, असे ते म्हणाले आणि हाच का तो नवा हिंदुस्थान, असा सवाल केला.

‘क्या हुआ तेरा वादा? वो कसम, वो इरादा?’ असे म्हणत रमेश यांनी १९७७ मधील ‘हम किसीसे कम नही’ या चित्रपटातील लोकप्रिय बॉलिवूड गाण्याच्या ओळींचा संदर्भ दिला.

मोदी सरकारने या अनियंत्रित महागाईवर तात्काळ कडक पावले उचलून सामान्यांना दिलासा द्यावा, असे काँग्रेस सरचिटणीस म्हणाले.

काँग्रेस सतत वाढत्या किंमतींचा मुद्दा उपस्थित करत असून सरकारची धोरणे ‘जनता विरोधी’ असल्याचे आरोप करत आहे.