राहुल गांधींना पप्पू ठरवण्यासाठी चालवलेलं खोटं कॅम्पेन भाजपवरच उलटलं, संजय राऊत यांचा घणाघात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या छात्रो की गुंज कार्यक्रमात एका कॉमेडियनने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मिमिक्री केली. यावरून भाजप नेत्यांनी काँग्रेसवर टीका केली. या पार्श्वभुमीवर अभिनयाचा ठेका फक्त मोदींनी घेतला आहे का? असा सवाल शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला. तसेच राहुल गांधींना पप्पू ठरवण्यासाठी चालवलेलं खोटं कॅम्पेन भाजपवरच उलटलं असा घणाघातही संजय राऊत यांनी केला.

मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत संजय राऊत म्हणाले की, लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मारलेला बाण भाजपच्या काळजात आरपार घुसलेला आहे. राहुल गांधी यांनी भारताच्या पराराष्ट्र धोरणाची परिस्थिती काय आहे, गळ्यात पडण्याची ते त्यांनी सोप्या शब्दांत विद्यार्थ्यांना आणि जनतेला समजावून सांगितलं. परराष्ट्र आणि आर्थिक धोरणं फार किचकट असतं, सामान्य माणसाला कळत नाही. ते त्यांच्या भाषेत सांगितलं की कळतं. याला जर देवेंद्र फडणवीस खिल्ली उडवत असतील तर याचा अर्थ ते हादरले आहेत. राहुल गांधी यांचा विषय सामान्यांपर्यंत पोहोचतोय. राहुल गांधींना पप्पू ठरवण्यासाठी यांनी शेकडो रुपये खर्च केले. त्याच राहुल गांधींनी नरेंद्र मोदींना पप्पू ठरवलं, ही त्यांच्या काळजातली सल आहे. आता राहुल गांधी पप्पू नसून मोदी पप्पू आहेत. राहुल गांधी देशाचे नेते आहे. मोदी देशाचे पंतप्रधान आहेत म्हणून त्यांना लोक मानसन्मान देतात. पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसाला दिवे लावण्याचा कार्यक्रम झाला, तो काय प्रकार होता हा कॉमेडियनचा वरचा प्रकार आहे. पंतप्रधान मोदी लोकसभेत आणि बाहेर ज्या पद्धतीने अनेक कॉमेडीचे प्रकार गेल्या काही काळापासून करत होते, मग ते पंडित नेहरु असतील, सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्याबाबत कॉमेडी करत होते तो काय प्रकार होता? देशात दोन जोकर आहेत आणि महाराष्ट्रात फडणवीसांच्या कॅबिनेटमध्ये जोकरांची फौजच आहे, त्यावर बोललं तर बरं होईल. राहुल गांधी हे देशाचे नेते आहेत आणि या देशाच्या परिस्थितीचे भान ठेवून त्या देशातल्या अंधभक्तांना देशाचं आर्थिक आणि परराष्ट्र धोरण कसं कोसळलं आहे हे अतिशय सोप्या शब्दात समजावून सांगतात. विरोधी पक्षाला उत्तम नट असावं लागतं. सोप्या भाषेत सांगायला विरोधी पक्षाला अभिनय करावा लागतो. अभिनयाचा ठेका फक्त मोदींनी घेतला आहे का? राहुल गांधी, उद्धव ठाकरे, राज ठाकरे अभिनय करू शकतात काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे उत्तम अभिनय करू शकतात. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी थोडं संयंमाने घेतले पाहिजे, त्यांना दिल्लीत जायचंय. दिल्लीत गेल्यावर त्यांना या सगळ्यांशी सामना करावा लागणार आहे, असेही संजय राऊत म्हणाले.

देशाच्या पंतप्रधान नरेंद्र मोदींची अशा प्रकारे मिमिक्री करणे योग्य आहे का? या प्रश्नावर संजय राऊत म्हणाले की, या सगळ्यांची सुरुवात कोणी केली? पंडित नेहरु यांची खिल्ली कोण उडवत होतं? पंडित नेहरु, इंदिरा गांधी, सोनिया गांधी त्यांच्यावर अत्यंत वाईट शब्दांत टीका कोण करत होतं. राहुल गांधी विरोधात कॅम्पेन केलं गेलं तेच आता यांच्या विरोधात उलटलं. पंतप्रधानांवर टीका करायची नाही असं संविधानात लिहिलंय का? कोणत्याही देशाचा पंतप्रधान चुकत असेल तर त्यांच्यावर टीका होणारच. पंतप्रधान टीकेच्या चौकटी बाहेर नाहियेत. राष्ट्रपती सोडून सगळ्यांवर टीका करण्याचा अधिकार या जनतेला आहे. तुम्ही राजकारणी आहात, लोकांच्या माध्यमातून तुम्ही निवडून आलेला आहात. तुम्ही जर चुकत असाल तर तुमच्यावर कठोर शब्दांत टीका केली जाईल, विरोधी पक्षनेत्याचे तेच काम आहे आणि महाराष्ट्रात आम्ही तेच काम करत आहोत, असेही संजय राऊत म्हणाले.

कोणीही फेक नॅरेटिव्ह पसरवलेले नाही, मग लोक रस्त्यावर उतरून आंदोलन का करत नाहीयेत. लोकं सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्यावर व्यवहारातून भार लादला जात आहे, त्याविरोधात पेट्रोल पंप, दुकानवाले विरोध करत आहेत. फडणवीसांच्या पत्नीने त्यांना चांगल्या डॉक्टरकडे नेले पाहिजे. फडणवीस कोणताही विषय समजून घेण्यापलीकडे गेले आहेत, अशी टीका संजय राऊत यांनी केली.