
कॅनडात उड्डाण प्रशिक्षणादरम्यान झालेल्या एका भीषण विमान अपघातात दोन हिंदुस्थानी विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. हे विद्यार्थी तमिळनाडू आणि पुद्दुचेरी येथील रहिवासी होते. व्हँकुव्हरमधील हिंदुस्थानी दूतावासाने रविवारी या घटनेची माहिती देत तीव्र शोक व्यक्त केला.
दूतावासाने दिलेल्या माहितीनुसार, मनोज शिवकुमार आणि श्रीशरण थिरुज्ञानासंबंतम अशी मृतांची नावे आहेत. त्यांचे पार्थिव हिंदुस्थानात परत आणण्यासह कुटुंबीयांना सर्वतोपरी दूतावास मदत पुरवण्यासाठी तयार असल्याचे सांगितले आहे.
नेमकी दुर्घटना कशी घडली?
स्थानिक वृत्तानुसार, ‘हार्म्स एअर’ (Harv’s Air) या उड्डाण प्रशिक्षण संस्थेचे ‘सेसना १७२’ (Cessna 172) हे विमान सस्कॅचेवानमधील किस्बे (Kisbey) गावाजवळ शुक्रवारी पहाटे कोसळले. या अपघातात विमानात असलेल्या दोघांचाही जागीच मृत्यू झाला.
कमर्शियल पायलट लायसन्ससाठी (CPL) आवश्यक उड्डाणाचे तास पूर्ण करण्यासाठी या दोन्ही परवानाधारक वैमानिकांनी हे विमान भाड्याने घेतले होते. रेजिना येथून कार्लाईलमार्गे मॅनिटोबा येथील स्टेनबॅककडे जात असताना रात्रीच्या प्रवासात ही दुर्घटना घडली. नियोजित वेळेनुसार विमान पोहोचले नसल्याने कॅनडाच्या वाहतूक सुरक्षा मंडळाकडे तक्रार नोंदवण्यात आली, त्यानंतर या भीषण अपघाताची माहिती समोर आली.


























































