भाजप नेते कैलाश विजयवर्गीय यांचे महिला नगरसेविकेबद्दल आक्षेपार्ह विधान… व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर काँग्रेसचा आक्षेप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मध्य प्रदेशचे कॅबिनेट मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते कैलाश विजयवर्गीय यांच्या एका वक्तव्यावरून वाद निर्माण झाला आहे. इंदूरच्या वॉर्ड क्रमांक 6 मध्ये सुमारे विकासकामांच्या उद्घाटन कार्यक्रमात विजयवर्गीय यांनी एका महिला नगरसेविकेच्या शारीरिक रूपावर टिप्पणी केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रकारावर काँग्रेसने आक्षेप घेतला असून, विजयवर्गीय यांच्या वक्तव्याला निंदनीय म्हटले आहे.

यापूर्वीदेखील 2023 मध्ये विजयवर्गीय यांनी इंदूर येथे हनुमान जयंती आणि महावीर जयंतीनिमित्त आयोजित एका धार्मिक कार्यक्रमात बोलताना म्हटले होते की, “आपण स्त्रियांमध्ये देवीचे रूप पाहतो. परंतु, मुली ज्या प्रकारची अयोग्य वस्त्रांनिशी वावरतात, त्यावरून त्या देवीसारख्या न वाटता ‘शूर्पणखे’सारख्या दिसतात.” असे म्हणत महिलांविषयी आक्षेपार्ह भाषा वापरली होती.

आज तक ने दिलेल्या वृत्तानुसार रविवारी वॉर्ड क्रमांक 6 मध्ये विविध विकास प्रकल्पांच्या उद्घाटनासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कैलाश विजयवर्गीय उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान एक महिला नगरसेविका त्यांच्या जवळून जात मायक्रोफोन स्टँडकडे येत असताना विजयवर्गीय यांनी त्यांच्याबद्दल टिप्पणी केल्याचे व्हिडिओमध्ये ऐकू येते.

व्हायरल व्हिडिओमध्ये विजयवर्गीय महिला नगरसेविकेबद्दल “दीदींची उंचीही थोडी वाढली आहे” असे म्हणताना ऐकू येतात. काही वृत्तांमध्ये त्यांच्या वक्तव्याचा अर्थ शारीरिक बदलाकडे निर्देश करणारा असल्याचे म्हटले आहे. मात्र, या वक्तव्याचा नेमका संदर्भ आणि त्यामागील हेतूबाबत विजयवर्गीय यांनी अद्याप कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही.

व्हिडिओ समोर आल्यानंतर या वक्तव्यावर सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली. काँग्रेसनेही यावर प्रतिक्रिया देत भाजपवर टीका केली आहे. अखिल भारतीय काँग्रेस समितीचे माध्यम समन्वयक नीलाभ शुक्ला यांनी विजयवर्गीय यांच्या वक्तव्यावर आक्षेप घेतला. महिलांच्या सन्मानाबाबत भाजपकडून सातत्याने भूमिका मांडली जाते, मात्र पक्षाच्या कार्यक्रमातच महिला लोकप्रतिनिधीच्या रूपावर अशा प्रकारची टिप्पणी होणे योग्य नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.