लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक शोषण केल्याप्रकरणी अभिनेता सौरव गुर्जरला अटक, १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लग्नाचे खोटे आमिष दाखवून लैंगिक शोषण केल्याच्या आरोपाखाली प्रसिद्ध अभिनेता आणि माजी कुस्तीपटू सौरव गुर्जर याला पोलिसांनी अटक केली आहे. एका २९ वर्षीय तरुणीने दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. न्यायालयाने त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा सध्या पोलीस तपास करत आहेत.

सौरव गुर्जरने ‘महाभारत’ मालिकेत ‘भीम’ ही भूमिका साकारून लोकप्रियता मिळवली होती; तसेच तो ‘ब्रह्मास्त्र: पार्ट वन – शिवा’ या चित्रपटात ‘झोर’च्या भूमिकेतही दिसला होता. पीडित तरुणीने १५ ऑगस्ट रोजी हैदराबादमधील गाचीबोवली पोलीस ठाण्यात सौरवविरुद्ध तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांनी त्याच्याविरोधात ‘लूक आऊट सर्कुलर’ जारी केले होते. १७ सप्टेंबरच्या रात्री सौरव दुबईवरून मुंबईत येत असताना इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी त्याला विमानतळावर रोखले. त्यानंतर हैदराबाद पोलिसांच्या पथकाने त्याला ताब्यात घेऊन हैदराबादला आणले आणि दंडाधिकाऱ्यांसमोर हजर केले. न्यायालयाने त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.

टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, तरुणीने पोलिसांना सांगितले की, २०२१ मध्ये इंस्टाग्रामच्या माध्यमातून तिची सौरवशी ओळख झाली होती. २५ डिसेंबर २०२१ रोजी त्यांची पहिली भेट झाली आणि त्यानंतर त्यांच्यात संबंध प्रस्थापित झाले. त्यानंतर हिंदुस्थान व अमेरिकेतही ते एकमेकांना भेटत होते. या दरम्यान सौरवने तो आधीच विवाहित असल्याचे सुरुवातीला लपवून ठेवले होते. मात्र नंतर त्याने “तुला पत्नीसारखाच दर्जा देईन आणि आपण एकत्र राहू” असे वारंवार आश्वासन दिले.

त्यानंतर तरुणी जेव्हा जेव्हा लग्नाचा विषय काढायची, तेव्हा तो तिच्याशी बोलणे टाळायचा, तिला फोन आणि सोशल मीडियावर ब्लॉक करायचा आणि कोणतीही माहिती न देता अचानक गायब व्हायचा. यामुळे तिला प्रचंड मानसिक, भावनिक आणि आर्थिक त्रासाला सामोरे जावे लागले. हिंदुस्थानात एकत्र व्यवसाय सुरू करू, असे सांगून सौरवने तिला अमेरिकेतील नोकरी सोडण्यास प्रवृत्त केले. त्याच्या शब्दावर विश्वास ठेवून ती एकत्र संसार थाटण्याच्या आशेने हिंदुस्थानात परतली आणि हैदराबादमध्ये स्थायिक झाली. मात्र, नंतर त्याने दिलेल्या आश्वासनांनुसार काहीही केले नाही. ऑक्टोबर २०२५ ते मार्च २०२६ या काळात सौरव तिच्यासोबत एकत्र राहत होता, मात्र त्यानंतर त्याने तिच्याशी अचानक सर्व संपर्क तोडून टाकला.

सौरवने दिलेली आश्वासने न पाळल्यामुळे आणि मानसिक-भावनिक फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तरुणीने अखेर पोलिसांत धाव घेत तक्रार नोंदवली. या प्रकरणी पोलीस आता पुढील कायदेशीर तपास करत आहेत.