Ratnagiri News – जपानी पर्यटकाला भावला जैतापूरचा गणेशोत्सव! गावकऱ्यांच्या आपुलकीने भारावले; मंडळाच्या वतीने स्वागत व सन्मान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जैतापूरचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या गणेशोत्सवाला जपानहून आलेल्या पर्यटकाने आवर्जून उपस्थिती लावत येथील भक्तिमय वातावरणाचा अनुभव घेतला. गणेशोत्सवातील श्रद्धा, उत्साह आणि जैतापूरकरांच्या प्रेमळ वागणुकीने भारावलेल्या या पर्यटकाने गावातील माणसांच्या आपुलकीचे विशेष कौतुक केले. परदेशी पाहुण्याच्या उपस्थितीने गणेशोत्सवाच्या आनंदात आणखी भर पडली.

जैतापूरचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या गणेशमूर्ती सोहळ्यादरम्यान जपानहून आलेल्या या पर्यटकाने गणेशमूर्तीचे फोटो आणि व्हिडिओ काढत सोहळ्याची आठवण जपली. मंडळाच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधताना त्यांनी गणेशोत्सवाची परंपरा, धार्मिक महत्त्व आणि उत्सवाच्या आयोजनाविषयी उत्सुकतेने माहिती जाणून घेतली. गेल्या दोन वर्षांपासून आपण या परिसरात येत असून, यंदा प्रथमच जैतापूरमधील गणेशोत्सव प्रत्यक्ष अनुभवत असल्याचे त्यांनी सांगितले.

जैतापूरच्या गणेशोत्सवाबरोबरच येथील नागरिकांच्या प्रेमळ स्वभावानेही या पर्यटकाचे मन जिंकले. शहर आणि गावातील माणसांच्या वागणुकीत फरक जाणवत असून, शहरापेक्षा गावातील लोक अधिक प्रेमळ आणि आपुलकीने वागतात, असे निरीक्षण त्यांनी नोंदवले. जैतापूरकरांनी आपल्याला दिलेला आदर आणि सन्मान याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. मात्र, आपला चेहरा आणि चेहऱ्याची ठेवण येथील लोकांपेक्षा वेगळी असल्याने अनेकजण कुतूहलाने आपल्याकडे पाहतात. त्यामुळे काही वेळा संकोच वाटत असल्याची भावनाही त्यांनी व्यक्त केली. तरीही गावकऱ्यांनी दाखवलेली आपुलकी आणि प्रेमळ वागणूक आपल्यासाठी आनंददायी असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.

परदेशातून आलेल्या पाहुण्याने जैतापूरच्या गणेशोत्सवाचा अनुभव घेत स्थानिक संस्कृती, श्रद्धा आणि माणुसकीचे केलेले कौतुक उपस्थितांसाठी आनंदाचा क्षण ठरला. गणेशोत्सवाच्या माध्यमातून परदेशी पर्यटकाला कोकणातील गावसंस्कृती आणि सामाजिक सलोख्याचा अनुभव घेता आला. जैतापूरचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने या पर्यटकाचे औचित्यपूर्ण स्वागत करून सन्मान करण्यात आला.यावेळी मंडळाचे अध्यक्ष गिरीश करगुटकर, राजन लाड, खजिनदार श्रीकृष्ण राऊत, सचिव सुनील करगुटकर, मनीष करगुटकर, महेश नारकर, रेशम लाड, राजेंद्रप्रसाद राऊत, गजानन करमळकर आदींसह मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.