Asian Games 2026 – 10 मिनिटांत खेळ खल्लास! हिंदुस्थानच्या लेकींनी पाकिस्तानच्या चिंध्या उडवल्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

Asian Games 2026 मध्ये हिंदुस्थानच्या लेकींनी टेबल टेनिसमध्ये आपला दरारा दाखवून दिला आहे. पाकिस्तानचा 3-0 असा धुव्वा उडवत टीम इंडियाच्या महिला टेबल टेनिस संघाने क्वार्टरफाइनलमध्ये दिमाखात प्रवेश केला आहे. या विजयासह महिला संघाने आपल्या विजयाची हॅट्ट्रीक साजरी केली. हिंदुस्थानने याआधी इंडोनेशिया आणि सिंगापूरवरही विजय मिळवला होता.

गट ‘एफ’मधील आपल्या साखळी सामन्यात सुतीर्था मुखर्जी, सिंड्रेला दास आणि श्रीजा अकुला यांनी उत्कृष्ट कामगिरी करत पाकिस्तानी खेळाडूंना एकही संधी दिली नाही. सामन्याची सुरुवात सुतीर्था मुखर्जीने केली, जिने अवघ्या 10 मिनिटांत अलीना खानचा 11-3, 11-3, 11-4 असा पराभव केला. सुतीर्था मुखर्जीने संघाला दमदार सुरुवात करून दिली. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात सिंड्रेला दासने कालसूम खानचा 11-6, 11-7, 11-5 असा पराभव करून संघाची आघाडी 2-0 अशी मजबूत केली. सुतीर्था आणि सिंड्रेला दासच्या पावलावर पाऊल ठेवत श्रीजा अकुलानेही आपले हात धुवून घेतले. तिने तिसऱ्या व निर्णायक सामन्यात फातिमा खानचा 11-4, 11-4, 11-5 असा सरळ सेटमध्ये पराभव केला.

Asian Games 2026 – हिंदुस्थानची डरकाळी! जपानचा धुव्वा उडवत नवव्या सुवर्णपदकाच्या दिशेने वाटचाल

या विजयासह हिंदुस्थानने पाच सामन्यांच्या मालिकेत पहिले तीन सामने जिंकून उपांत्यपूर्व फेरीतील आपले स्थान निश्चित केले आहे. यापूर्वी 2022 च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत हिंदुस्थानचा महिला संघ राउंड ऑफ 16 मधून बाहेर पडला होता. मात्र, यंदा हिंदुस्थानने संपूर्ण स्पर्धेत आतापर्यंत दमदार आणि अजिंक्य खेळ करत नवा इतिहास रचला आहे. महिला संघाच्या या उत्कृष्ट कामगिरीमुळे देशावसियांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.