ड्युटीवरून घरी परतताना कॅब पुलाच्या कठड्याला धडकली, इंडिगो केबिन क्रू चा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ड्युटीवरून घरी परतताना कॅब पुलाच्या कठड्याला धडकल्याने अपघातात इंडिगो केबिन क्रू चा मृत्यू झाला आहे. कैन्नूर मिस्त्री (32) असे मयत महिलेचे नाव आहे. मुंबईतील वेस्टर्न एक्सप्रेस महामार्गावर ही घटना घडली. मिस्त्रीच्या मृत्यूमुळे तिचा आठ वर्षाचा मुलगा आईच्या मायेला पोरका झाला आहे.

एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, मिस्त्री ही ड्युटीवरून घरी परतत असताना इंडिगोच्या कर्मचाऱ्यांसाठी उपलब्ध करून दिलेल्या मारुती सुझुकी स्विफ्ट डिझायर कारमधून घरी परतत होती. बोरीवली (पूर्व) येथील वेस्टर्न एक्सप्रेस हायवेच्या उत्तर दिशेकडे जाणाऱ्या मार्गिकेवर 18 सप्टेंबर रोजी 5.45 च्या सुमारास ब्लू स्काय को-ऑपरेटिव्ह सोसायटीजवळ कॅब पुलाच्या कठड्याला धडकली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुलावर वळण घेताना चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि कार पुलाच्या कठड्याला धडकली. गाडीच्या मागील सीटवर बसलेल्या मिस्त्री यांच्या डोक्याला या धडकेमुळे गंभीर दुखापत झाली. चालकाला कोणतीही दुखापत झाली नाही. अपघातानंतर, चालकाने घटनास्थळी उपस्थित नागरिकांच्या मदतीने मिस्त्री यांना मीरा रोड येथील भक्तिवेदांत रुग्णालयात नेले. शनिवारी संध्याकाळी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

याप्रकरणी कस्तुरबा मार्ग पोलिसांनी कॅब चालक विजय खोसे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सुरुवातीला, निष्काळजीपणे वाहन चालवणे आणि इतरांचा जीव धोक्यात घालणे या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. कैन्नूर मिस्त्री यांच्या मृत्यूनंतर, आता भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम 106(1) अन्वये निष्काळजीपणामुळे मृत्यू झाल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.