
तुमच्या नावावर किती मोबाईल कनेक्शन सुरू आहेत, याची तपासणी करण्याचा सल्ला केंद्र सरकारने नागरिकांना दिला आहे. दूरसंचार विभागाने (DoT) नागरिकांना ‘संचार साथी’ पोर्टल आणि मोबाइल अॅपच्या माध्यमातून आपल्या नावावर जारी करण्यात आलेले सर्व मोबाईल नंबर तपासण्याचे आवाहन केले आहे. यापैकी अनावश्यक किंवा आपले नसलेले नंबर असल्यास ते ब्लॉक करण्याची सुविधाही या प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे.
छत्तीसगडमध्ये झालेल्या एका सायबर गुन्ह्याच्या तपासादरम्यान हा प्रकार समोर आल्यानंतर दूरसंचार विभागाने नागरिकांना हा सल्ला दिला आहे. तपासात एका सिमकार्ड विक्री केंद्रातील एजंटने नागरिकांच्या माहितीशिवाय आणि त्यांच्या संमतीशिवाय त्यांच्या ओळखपत्रांचा वापर करून तब्बल 25 मोबाईल कनेक्शन (सिमकार्ड) बेकायदेशीरपणे सुरू केल्याचे आढळले.
या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर दूरसंचार विभाग आणि संबंधित दूरसंचार सेवा पुरवठादारांनी तातडीने संबंधित एजंटला काळ्या यादीत टाकले. त्यामुळे भविष्यात त्याला नवीन मोबाईल कनेक्शन जारी करता येणार नाही. या 25 मोबाईल कनेक्शनची तपासणी करण्यात आली असून, पुन्हा पडताळणीमध्ये पात्र न ठरलेले नंबर बंद करण्यात आले, अशी माहिती दूरसंचार विभागाने दिली.
तीन वर्षांपर्यंत शिक्षा, 50 लाख रुपयांपर्यंत दंड
दूरसंचार विभागाने नागरिकांना सिमकार्ड आणि मोबाईलशी संबंधित माहितीबाबत सावध राहण्याचे आवाहन केले आहे. बनावट पद्धतीने सिमकार्ड जारी करणे, दूरसंचार ओळख क्रमांकाचा गैरवापर करणे किंवा IMEI क्रमांकात छेडछाड करणे हा दूरसंचार कायदा, 2023 अंतर्गत दंडनीय गुन्हा आहे. अशा प्रकरणात 3 वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि 50 लाख रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो.
आपल्या नावावरील सिम दुसऱ्याला देऊ नका
आपल्या नावावर जारी करण्यात आलेले सिमकार्ड दुसऱ्या व्यक्तीला वापरण्यासाठी देऊ नये किंवा हस्तांतरित करू नये, असा इशाराही सरकारने दिला आहे. आपल्या नावावर असलेल्या सिमचा गैरवापर झाल्यास त्याची कायदेशीर जबाबदारी मूळ ग्राहकापर्यंत पोहोचू शकते.
त्यामुळे नागरिकांनी नियमितपणे ‘संचार साथी’ पोर्टल किंवा मोबाइल अॅपवर जाऊन आपल्या नावावर जारी करण्यात आलेल्या सर्व मोबाईल कनेक्शनची पडताळणी करावी, असे दूरसंचार विभागाने म्हटले आहे. आपल्या नावावर असलेला अनावश्यक किंवा आपला नसलेला मोबाईल नंबर असल्यास तो ब्लॉक करण्याची सुविधाही या प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे.
सिम आणि IMEIच्या गैरवापरावर सरकारचे लक्ष
देशभरात मोबाईल कनेक्शन आणि डिजिटल सेवांचा झपाट्याने विस्तार होत असताना सिमकार्ड, दूरसंचार ओळख क्रमांक तसेच मोबाईल उपकरणांचा इंटरनॅशनल मोबाइल इक्विपमेंट आयडेंटिटी (IMEI) क्रमांक यांचा गैरवापर हा गंभीर चिंतेचा विषय बनला आहे.
सायबर गुन्ह्यांमध्ये दूरसंचार संसाधनांचा गैरवापर रोखण्यासाठी आणि सुरक्षित व विश्वासार्ह संपर्क व्यवस्था निर्माण करण्यासाठी नागरिकांनी आपल्या नावावर असलेल्या मोबाईल कनेक्शनची नियमित तपासणी करणे महत्त्वाचे असल्याचे दूरसंचार विभागाने म्हटले आहे.



























































