Ratnagiri News – रोवले परिसरात बिबटयाचा वावर वाढला; रहिवाशांनमध्ये भितीचे वातावरण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बॉक्साईट खनिज उत्खनन सुरू असलेल्या रोवले या गावात बिबट्याच्या संचाराचा प्रचंड वावर वाढला आहे. याबाबत वन विभागाला कळवून सुध्दा ढिम्म वन विभाग प्रशासनाने बिबटयाचा वाढलेला वावर काबुत ठेवण्यासाठीची काहिच उपाय योजना केली नाही. त्यामुळे हेच का ते गतिमान प्रशासनाचे कृतिशील सुशासन अशाप्रकारचा प्रश्न कोणालाही पडल्याशिवाय राहात नाही.

दापोली तालुक्यातील रोवले या महसुली गावात बॉक्साईट खनिज उत्खननामुळे येथील वन संपदा पार नष्ट झाली आहे.अशा या गावात मागील काही दिवसांपासून बिबट्याचा प्रचंड वावर वाढला असून बिबट्याच्या वाढलेल्या संचाराने येथील रहिवासी बिबट्याच्या भितीने दहशतीखाली वावरत आहेत.

केळशी परिसरातील केळशी आतगाव उंबरशेत रोवले वांझळोली डौली मार्गे दापोली हा मार्ग तसा वर्दळीचाच अशा या मार्गावरील अनेक गावांपैकी उंबरशेत आणि रोवले या दोन महसुली गावाच्या हद्दीत गेल्या पंचवीस वर्षापासून बाॅक्साईट खनिज उत्खनन सुरू असल्याने येथील वनसंपदा समुळ नष्ट करण्यात आली आहे. खनिज उत्खननामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडणा-या या घटनेच्या पूर्व परवानगीसाठी जन सुनावणी घेण्यात आली त्यावेळी येथील अनेकांनी येथील घनदाट वनाच्या जंगल तोडीमुळे जंगली प्राण्यांच्या अधिवासाच्या प्रश्नासह प्राण्यांच्या खादयाचा प्रश्न निर्माण होण्याचा मुद्दा उपस्थित केला होता. मात्र चार दोन लोकांच्या फायदयासाठी तसेच काही लोकप्रतिनीधींचे हितसंबंध जोपासण्यासाठी ग्रामस्थांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांकडे प्रशासनाने सोयीस्कररित्या विरोध डावळून दुर्लक्ष केले.आणि बाॅक्साईट खनिज उत्खननाला परवानगी दिली. बाॅक्साईट खनिज उत्खननामुळे येथील वनसंपदा समुळ नष्ट झाली आहे. त्यामुळे जंगली प्राण्यांच्या अधिवासासह त्यांच्या अन्नाचाही भिषण प्रश्न निर्माण झाला . त्यामुळे बिबटया सारखे हिंस्र प्राणी भक्ष्याच्या शोधात नागरी वस्तीकडे बिनधास्तपणे फिरकू लागले आहेत. रोवले परिसरात बिबट्याचा मुक्तसंचार खुपच वाढलेला आहे. दिवसा ढवळ्या राजरोसपणे वावरणाऱ्या बिबट्याच्या संचारामुळे उंबरशेत रोवले आतगाव आंबवली बुद्रुक, माळवी, वांझळोली येथील लोकांना शेती कामासाठी बाहेर पडणे भितीचे झाले आहे .