सणानिमित्त तलावात अंघोळीला गेली ती परतलीच नाही, 6 मुलांचा बुडून मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कर्मा-धर्मा सणानिमित्त तलावात अंघोळीला गेलेल्या सहा मुलांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना सोमवारी बिहारमधील भागलपूरमध्ये घडली. मृतांमध्ये तीन मुले आणि तीन मुलींचा समावेश आहे. सर्व मुले 12 ते 13 वयोगटातील आहेत.

फ्री प्रेस जर्नलने दिलेल्या वृत्तानुसार, ‘कर्मा-धर्मा’ सणानिमित्त ही मुले तलावावर अंघोळ करण्यासाठी गेली होती. अचानक एक जण खोल पाण्यात बुडू लागला. त्याला बुडताना पाहून इतर मुलांनीही त्याला वाचवण्याच्या प्रयत्नात पाण्यात उड्या मारल्या आणि सर्वजण बुडाले.

घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत सर्वांना पाण्यातून बाहेर काढले. सर्वांना तात्काळ रेफरल रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले. सर्व मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत.