सामना अग्रलेख – बलात्कार – भारतीय स्वातंत्र्यावर…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रात्रीच्या अंधारात सरकारने सोनम वांगचुक यांना जबरदस्तीने उचलले. तसेच लोकसभा अध्यक्षांनीही काळोखातच शिवसेना व तृणमूल काँग्रेसमधील ‘गद्दार’ गटाला मान्यता दिली. भारतीय घटनेतील 10 व्या अनुच्छेदानुसार कोणत्याही प्रकारच्या पक्षफुटीस मान्यता नसताना अमित शहा व त्यांची गँग रोज पक्ष फोडून नवी टोळी निर्माण करतात आणि त्या गद्दार टोळक्यांना लोकसभा अध्यक्ष मान्यता देतात. मोदी सरकारकडून स्वातंत्र्य आणि लोकशाही, संविधानावर होत असलेल्या बलात्कार व खुनाचे हे प्रकरण आता जगासमोर न्यावे लागेल. राममंदिर चोरांना माफी नाही तशी गद्दारांना मान्यता देणाऱ्यांनाही माफी नाही.

भारतीय लोकशाहीचा पूर्णपणे बोजवारा उडाला आहे. दोन ठळक घटना मागच्या दोन दिवसांत सरकारने घडवून आणल्या, तो सर्व प्रकार म्हणजे लोकशाहीवर बलात्कार व खून करून लोकशाहीचे कलेवर रस्त्यावर फेकण्यासारखेच आहे. ‘नीट’ परीक्षेतील पेपरफुटीप्रकरणी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीच्या ‘जंतर मंतर’वर उपोषणाला बसलेल्या सोनम वांगचुक यांना दिल्ली पोलिसांनी जोरजबरदस्तीने ताब्यात घेतले व रुग्णालयात दाखल केले. वांगचुक यांच्या उपोषणाच्या विसाव्या दिवशी हे घडले. संसदेचे अधिवेशन सोमवारी सुरू होत आहे व शनिवारी मध्यरात्रीनंतर अमित शहांचे पोलीस ‘जंतर मंतर’वर हाती बंदुका घेऊन घुसले. एखाद्या दहशतवाद्याला घेरावे तसे कोम्बिंग ऑपरेशन एका गांधीवादी कार्यकर्त्याच्या अटकेसाठी करावे यातच सरकारचा डरपोकपणा सिद्ध झाला. सरकारचे पोलीस दिवसाढवळ्या आले नाहीत. तेवढी त्यांची हिंमत झाली नाही. ते चोरासारखे आले व वांगचुक यांना ओढत नेले. 20 दिवसांच्या उपोषणाने थकलेला वांगचुक यांचा देह प्रतिकार करू शकला नाही. पोलिसांचे हे कृत्य म्हणजे त्यांच्या नामर्दपणाचे लक्षण आहे. कॉक्रोच जनता पार्टीचे नेते अभिजीत दीपके यांच्यावर पोलिसांनी लाठीहल्ला केला. भाजपच्या एका महिलेने दीपके यांच्यावर शाई फेकली. या ‘मर्दानगी’मुळे भाजप सरकारचे नपुंसकत्व समोर येत आहे. वांगचुक यांना उपोषण स्थळावरून हटवल्याने सरकारविरुद्धचा संताप वाढला आहे. सरकारला भ्रष्टाचाऱ्यांना, व्यभिचाऱ्यांना पाठीशी घालायचे आहे व त्याविरुद्ध आवाज उठवणाऱ्यांना तुरुंगात टाकायचे आहे. देशातील लोकशाहीला बदनाम आणि गढूळ करण्याचा हा प्रयत्न आता एकजुटीने हाणून पाडायला हवा. असत्य, दडपशाही व बंदुकांचा धाक यावरून मोदी सरकार टिकून आहे. ‘नीट’ परीक्षेतील घोटाळ्याप्रमाणे निवडणुकीत अनेक घोटाळे करून मोदी व त्यांचे लोक जिंकले आहेत. स्वातंत्र्य व लोकशाहीच्या चिता पेटवून हे लोक सत्तेवर आले हे आता लपून राहिलेले नाही. म्हणूनच सोनम वांगचुक यांचे उपोषण, त्यांना मिळत असलेले समर्थन पाहून सरकार घाबरले. मोदी हे प्रे. ट्रम्प यांना, इस्रायलच्या नेतान्याहू यांना, सेक्स स्पॅण्डलवाल्या एपस्टीनला घाबरतात. ते व त्यांचे सरकार डरपोक आहे. त्यांची छातीही 56 इंचांची नसून तो एक माचीसचा रिकामा खोका आहे. तसे नसते तर त्यांनी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतला असता. भ्रष्ट न्याय व्यवस्था, लोकशाहीविरोधी निकाल देणारे लोकसभेचे अध्यक्ष यांना बरखास्त करून भारतीय लोकशाहीची प्रतिमा तेजस्वी केली असती. वांगचुक इस्पितळात आहेत व तेथेही त्यांचा लढा सुरूच आहे. ते थकले आहेत, पण कणभरही मागे हटले नाहीत. वांगचुक यांनी इस्पितळातील अतिदक्षता विभागातून भारतीय जनतेसाठी पाठवलेला संदेश महत्त्वाचा आहे. त्यांनी स्व-हस्ताक्षरांत लिहून पाठविले आहे की,

‘हे स्वातंत्र्याचे दुसरे आंदोलन.
भयमुक्त भारत,
अन्यायमुक्त भारत!’

वांगचुक यांचे आंदोलन पेटत जाईल व लोकशाहीविरोधी ‘व्यापारी’ सरकार त्या आगीत भस्मसात होईल.

…आणि भारतीय घटनेवर!

रात्रीच्या अंधारात सरकारने सोनम वांगचुक यांना जबरदस्तीने उचलले. तसेच लोकसभा अध्यक्षांनीही काळोखातच शिवसेना व तृणमूल काँग्रेसमधील ‘गद्दार’ गटाला मान्यता दिली. भारतीय संसदेच्या महान प्रतिष्ठेला कलंक लावण्याचे हे काम विद्यमान लोकसभा अध्यक्षांकडून झाले. त्यांनी हिंदुत्वाचा ‘ओम’ही डबक्यात बुडवला. मशाल चिन्हावर निवडून आलेले सहा बेइमान, लंपट खासदार फेकनाथ मिंधे यांनी पन्नास-पन्नास कोटींना विकत घेतले. त्यांनी वेगळा गट स्थापन करून मिंधे गटात विलीनीकरण करण्याची मागणी केली व भाजपच्या लोकसभा अध्यक्षांनी हा गद्दारीचा नजराणा मान्य करून मिंधे गटाला तो बहाल केला. हे कृत्य भारतीय संविधानाविरुद्ध आहे. संसदेच्या आवारात, दालनात, लोकसभा अध्यक्षांच्या चेंबरमध्ये लोकशाहीचे झालेले हे फक्त वस्त्रहरणच नाही, तर संसदेच्या चौकीदाराने केलेला बलात्कार आणि खून आहे. भारतीय लोकशाहीत निर्माण झालेल्या रामन राघवने स्वातंत्र्याच्या डोक्यावर रोज प्रहार करून रक्ताचे थारोळे निर्माण केले व नरपिशाचांप्रमाणे राज्यकर्ते त्या रक्ताच्या थारोळ्यात नाचून आनंद साजरा करत आहेत. राज्यकर्त्यांनी शिवसेनेच्या मस्तकावर प्रहार केला, ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसच्या मस्तकावर प्रहार केला, आम आदमी पार्टीच्या मस्तकावर प्रहार केला. तरीही ते राष्ट्रभक्तांची लढाई रोखू शकणार नाहीत. भारतीय घटनेतील 10 व्या अनुच्छेदानुसार कोणत्याही प्रकारच्या पक्षफुटीस मान्यता नसताना अमित शहा व त्यांची गँग रोज पक्ष फोडून नवी टोळी निर्माण करतात आणि त्या गद्दार टोळक्यांना लोकसभा अध्यक्ष मान्यता देतात. मोदी सरकारकडून स्वातंत्र्य आणि लोकशाही, संविधानावर होत असलेल्या बलात्कार व खुनाचे हे प्रकरण आता जगासमोर न्यावे लागेल. राममंदिर चोरांना माफी नाही तशी गद्दारांना मान्यता देणाऱ्यांनाही माफी नाही.