ला रोजा… जगाचा राजा !

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> मंगेश वरवडेकर

पृथ्वी गोल आहे. फुटबॉलही गोल आहे. पण या दोन्हींपेक्षा जास्त गोल आहे तो इतिहास. तो फिरतोच आहे. कधी त्याने ब्राझीलच्या पायाशी लोळण घेतली, कधी तो अर्जेंटिनाच्या मिठीत शिरला, तर कधी त्याने जर्मनीच्या शिस्तीला सलाम ठोकला. पण आज इतिहासाने पुन्हा एकदा लाल रंगाची शाल पांघरली. सोळा वर्षांपूर्वी पहिल्यांदा जग जिंकणाऱ्या स्पेनने पुन्हा जगाला गुडघे टेकायला लावलं. विशेष म्हणजे, सिंहासनावर बसण्यासाठी त्याने विद्यमान जगज्जेत्या अर्जेंटिनालाच खाली उतरवलं. राजाला हरवून राजा होण्याची मजाच वेगळी असते.

2010 पूर्वी स्पेन हा कायम हुशार विद्यार्थी होता. वर्गात उत्तरं त्याच्याकडे असायची, पण पहिला नंबर दुसराच घ्यायचा. चेंडू त्याच्या पायाशी असायचा, टाळय़ा त्यालाच मिळायच्या, पण ट्रॉफी मात्र दुसऱ्याच विमानात बसून जायची. फुटबॉलची बाराखडी त्याला पाठ होती, पण पदवी मिळत नव्हती. दक्षिण आफ्रिकेच्या वर्ल्ड कपमध्ये मात्र त्याने थेट पीएच.डी.च मिळवली.

त्या स्पेनने फुटबॉल खेळला नव्हता, फुटबॉलला नृत्य शिकवलं होतं. झावी आणि इनिएस्ता चेंडूला लाथ मारत नव्हते, त्याला बासरीच्या सुरावर नाचवत होते. झाबी अलोन्सोने डोकं वापरलं, डेव्हिड व्हियाने गोल केले, कॅसियासने किल्ला सांभाळला. ‘टिकी-टाका’ ही फक्त रणनीती नव्हती, ती फुटबॉलची कविता होती. प्रतिस्पर्धी संघ चेंडूच्या मागे धावत होते आणि स्पेन चेंडूशी गप्पा मारत होता. इनिएस्ताच्या एका गोलने नेदरलँड्सचं स्वप्न मोडलं आणि स्पेनच्या नावापुढे पहिल्यांदा ‘जगज्जेता’ लिहिलं गेलं.

पण फुटबॉल हा फार स्वार्थी मित्र आहे. आज मिठी मारतो, उद्या विसरतो. 2014 मध्ये स्पेनला पहिल्याच फेरीत बाहेर पडावं लागलं. 2018 मध्ये पेनल्टी शूटआऊटमध्ये ते यजमान रशियाकडून हरले. 2022 मध्ये मोरोक्कोने आरशात स्वतःचाच चेहरा दाखवला. ज्या टिकी-टाकाला जग डोक्यावर घेत होतं, त्याच्यावर टीकाही झाली. लोक म्हणू लागले,‘पास तर हजार… पण गोल कुठे?’ जणू तीन तासांचा सिनेमा पाहिला आणि शेवटी नायकाने खलनायकाला मारलंच नाही. पण मोठे संघ पराभवात मरत नाहीत. ते पराभवातूनच पुन्हा जन्म घेतात. स्पेनने जुनं पुस्तक फाडलं नाही, त्याची नवी आवृत्ती काढली. झावी-इनिएस्ता यांच्या जागी पेद्री आला. गावी आला. निको विल्यम्स आला. आणि मग आला लामिन यमाल. एवढा लहान की, त्याचं वय पाहिलं की वाटतं, हा वर्ल्ड कप पाहत मोठा व्हायचा होता, पण तो तर वर्ल्ड कप जिंकायलाच आला होता. चेंडू त्याच्या पायाशी येतो तेव्हा तो त्याचा मालक नसतो, जिवलग मित्र असतो.

या वर्ल्ड कपमध्ये स्पेनने फक्त सामने जिंकले नाहीत, त्यांनी फुटबॉलचा हरवलेला आत्मा परत आणण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या प्रत्येक गोलमध्ये कल्पकता होती. प्रत्येक विजयात संघभावना होती. हा एका सुपरस्टारचा संघ नव्हता, हा अकरा कलाकारांचा ऑर्केस्ट्रा होता. प्रत्येकाने आपापलं वाद्य वाजवलं आणि जग मंत्रमुग्ध झालं. पूर्ण स्पर्धेत त्यांनी एकच गोल खाल्ला. ही करामत जितकी गोलकीपर उनाय सिमॉनची आहे, तितकीच स्पेनच्या खेळाडूंचीही आहे. ग्लोव्हजप्रमाणे स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू म्हणजे गोल्डन बॉलचा मानकरी ठरला
स्पॅनिश कर्णधार रॉड्री. तो त्याचाच अधिकार होता. स्पर्धेतील सर्वोत्तम युवा खेळाडूसाठी लामिन यमाल आणि पा कुबारसी या स्पॅनिश खेळाडूंमध्येच संघर्ष रंगला आणि कुबारसीने बाजी मारली.

काल रात्री रंगलेली अर्जेंटिनाविरुद्धची फायनल म्हणजे दोन युगांची भेटच होती. एका बाजूला मेस्सीच्या जादूचा शेवटचा अध्याय, तर दुसऱ्या बाजूला यमालच्या नव्या पर्वाची पहिली ओळ. अनुभवी हात विरुद्ध तरुण पाय. पण इतिहासाला कधी कधी नवीन शाई हवी असते. ती आज स्पेनने दिली. जगज्जेत्याला हरवून जग जिंकण्याचा आनंद वेगळाच असतो. हा विजय फक्त ट्रॉफीचा नव्हता, तो नव्या पिढीच्या आत्मविश्वासाचा होता.

क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलिया जशी पिढ्या बदलल्या तरी जिंकत राहते, तसाच संदेश स्पेनने फुटबॉलला दिला. फुटबॉल हा एका मेस्सीचा, एका यमालचा किंवा एका पेद्रीचा खेळ नाही. तो संस्कृतीचा खेळ आहे. शाळांमधल्या मैदानांपासून बार्सिलोनाच्या अकादमीपर्यंत आणि माद्रिदच्या रस्त्यांपासून सेव्हियाच्या गल्लीपर्यंत एकाच स्वप्नाची मशागत करणाऱ्या देशाचा खेळ आहे.

आज स्पेनच्या प्रत्येक घरात आनंदाची दिवाळी आहे. माद्रिदच्या रस्त्यांवर जल्लोष आहे. ला रोजा अर्थातच लाल जर्सीधारी अमेरिका किंवा स्पेनमध्येच नव्हे, तर जगभर आनंदाने फिरताहेत. आता पुढील चार वर्षे तेच जगाचे राजे असतील. बार्सिलोनात गाणी घुमत आहेत. सेव्हिया, व्हॅलेन्सिया, बिलबाओपासून छोट्या-छोट्या गावांपर्यंत लाल-पिवळे झेंडे अभिमानाने फडकत आहेत. लाखो मुलं आज आरशासमोर उभी राहून स्वतःला यमाल समजून गोल साजरा करत असतील. कुणी पेद्रीसारखा पास देण्याचं स्वप्न पाहत असेल, तर पुणी निको विल्यम्ससारखी वाऱ्याशी शर्यत लावत असेल. स्पेनने आज जिंकलेली सर्वात मोठी ट्रॉफी ही सोन्याची नाही; ती या नव्या पिढीच्या डोळ्यांत पेटवलेली स्वप्नं आहेत.

पण या विजयाची खरी गंमत अजून पुढे आहे. पुढचा वर्ल्ड कप 2030 मध्ये स्पेन, पोर्तुगाल आणि मोरोक्को यांच्या संयुक्त विद्यमाने होणार आहे.
फुटबॉलच्या शतकपूर्तीचा तो सोहळा असेल. शंभर वर्षांचा प्रवास पूर्ण करणारा वर्ल्ड कप आणि त्याचा एक यजमान देश असेल विद्यमान जगज्जेता स्पेन. इतिहासालाही अशी पटकथा वारंवार लिहिता येत नाही. आपल्या घरच्या मैदानावर, आपल्या लाखो चाहत्यांसमोर, स्वतःच्या तिरंग्यासारख्या लाल-पिवळ्या झेंड्यांच्या साक्षीने जगज्जेतेपद राखण्याची सुवर्णसंधी स्पेनसमोर असेल. यमाल तेव्हा अधिक परिपक्व झालेला असेल, पेद्री आपल्या कारकिर्दीच्या बहरात असेल, आजची ही तरुण पिढी तेव्हा अनुभवी सेनापती बनलेली असेल.

फुटबॉलमध्ये मुकुट जिंकणं अवघड असतं, पण तो टिकवणं त्याहून कठीण. आता स्पेनसमोर तीच खरी परीक्षा आहे. पुढची चार वर्षे प्रत्येक प्रतिस्पर्धी त्यांच्याकडे जगज्जेता म्हणून पाहणार आहे. प्रत्येक सामना म्हणजे सिंहासनावरचा दावा असणार आहे. पण महान संघ आव्हानांपासून पळत नाहीत, ते त्यांना कवटाळतात. म्हणून आजचा हा विजय शेवट नाही. तो 2030 च्या नव्या स्वप्नाचा पहिला दिवस आहे.

आज फुटबॉलच्या दरबारात एकच घोषणा घुमतेय, ला रोजा… राजा.

कदाचित पुढची चार वर्षेही हीच घोषणा जगभर ऐकू येत राहील. कारण आता प्रत्येकाला एकच प्रश्न पडणार आहे की, स्पेन पुन्हा आपल्या घरच्या अंगणात जग जिंकणार का?