Nanded News – पंजाबमधून नांदेडमध्ये अपहरण झालेल्या अल्पवयीन मुलीची १० दिवसांत सुखरूप सुटका; आरोपीला बेड्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नांदेड जिल्हा पोलिसांनी ऑपरेशन मुस्कान अंतर्गत आणखी एक मोठे यश मिळवत नांदेडमधून अपहरण झालेल्या अल्पवयीन मुलीची अवघ्या दहा दिवसांत सुखरूप सुटका केली. तांत्रिक तपास, गुप्त माहिती आणि पोलिसांच्या चपळ कारवाईच्या जोरावर पंजाबमध्ये लपून बसलेल्या आरोपीपर्यंत पोहोचत त्याला बेड्या ठोकण्यात आल्या. या धाडसी कारवाईमुळे नांदेड पोलिसांच्या तपास कौशल्याचे पुन्हा एकदा दर्शन घडले.

फिरोजपूर (पंजाब) येथील अल्पवयीन मुलगी पालकांसोबत सचखंड गुरुद्वाराच्या दर्शनासाठी नांदेड येथे आली होती. याचवेळी एका तरुणाने तिचे फूस लावून अपहरण केले. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली होती. वजीराबाद पोलीस ठाण्यात तात्काळ गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष तपास पथकाने युद्धपातळीवर तपास सुरू केला.

तपासादरम्यान तांत्रिक विश्लेषण, मोबाईल लोकेशन, गोपनीय माहिती आणि विविध सूत्रांचा आधार घेत पोलिसांनी आरोपीचा माग काढला. पंजाबमधील पाटियाला जिल्ह्यातील दोदरा येथे छापा टाकून अल्पवयीन मुलीची सुखरूप सुटका करण्यात आली. यानंतर आरोपी जसपालसिंह उर्फ अवतारसिंह (२३) रा.दोदरा ता.समाना जि.पटीयाला (पंजाब) याला ताब्यात घेऊन त्याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता आणि पॉक्सो कायद्यांतर्गत गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुटका करण्यात आलेल्या मुलीला आवश्यक संरक्षण देत बाल सुधारगृहात सुरक्षित ठेवण्यात आले असून, पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे. या संपूर्ण कारवाईत वजीराबाद पोलीस, सायबर पोलीस आणि विशेष तपास पथकातील अधिकार्‍यांनी समन्वयाने काम करत अवघ्या दहा दिवसांत हे मोठे यश मिळवले.

नांदेड पोलिसांचा पुन्हा एकदा दबदबा
ऑपरेशन मुस्कान अंतर्गत हरवलेली व अपहरण झालेली मुले शोधण्याची मोहीम नांदेड जिल्हा पोलीस प्रभावीपणे राबवत असून, या कारवाईमुळे पालकांमध्ये विश्वास निर्माण झाला आहे. हरवलेल्या बालकांबाबत कोणतीही माहिती मिळाल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.